अस्तीस्तंभ
एक असं ठिकाण जे खूप जवळ आहे आणि फारसं लोकांना माहिती नाही म्हणून हा एवढा लेखनप्रपंच.आजवर बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन अनेक वेगवेगळी ठिकाणी बघितली होती , अस्तीस्तंभाबद्दल फक्त ऐकून होतो.तेही असंच Whatsapp वरती फॉरवर्डेड massage मुळे. त्यामुळे आज ते काहीही करून बघायचं हे ठरलेलं.खोतवाडी सोडून कुंभारवाडीकडे जाताना ही दगडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना लक्ष वेधून घेते.रस्त्यापासून ती तेवढी पण थोडं अश्नीस्तंभाकडे चालत गेलो की उंच उंच अश्या शीला एकमेकांवर रचलेल्या आहेत असे दिसतात ,या रचनेला अश्नी स्तंभ असे म्हणतात. आज आम्हाला अश्नीस्तंभा जवळ जाण्याकरता रस्ता सापडला नाही किंवा नसेलही.इकडे आमची एन्ट्री पहिल्यादाच होती,त्यामुळे इकडच्या सर्व गोष्टी नवीन होत्या आणि आमची उत्सुकता आम्हाला गप्प बसून देत नव्हती.मंग आम्ही एकमेकांना बोललो चला आपण डोगर चढुया आणि जवळून जाऊन पाहूया.जायला नीट पाय वाटही नव्हती कारण अंदाजे ७० /९० अंश कोणातला उभा डोंगर होता त्यावर दगड, उंच वाढलेलं गवत आणि निसरडी वाट.गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत टोचत होतं. हातापायावर काट्याचे चांगलेच ओरखडे उठत होते. साधारण १० ते १५ मिनिटं कसरत केल्यानंतर तो क्षण आला.आम्हाला खरंतर धाप लागलेली, केस विस्कटलेली, घामानी भिजून निघालेलो, घशाला कोरड... इतरवेळी हे सगळं वैतागवाणं आणि नको असं असतं. पण त्या क्षणी वैताग नव्हता. आमच्या तोंडून एकदम एकच शब्द बाहेर पडला....पोहोचलो एकदाच जवळ !
कड्यावर उभं राहून आम्ही बराच वेळ अश्नीस्तंभ पाहात होतो. सूर्यास्त होत चाललेला त्यामुळे केशरी रंगाने मस्त तो परिसर उजळून निघाला होता ते सौंदर्य पाहून लव्ह अॅट फर्स्ट साईट काय असतं हे आज कळालं.
थोडीफार इकडून तिकडून जी माहिती मिळाली ती अशी ..
साधारण साठ लाख छप्पन हजार वर्षांपूर्वी जेव्हा पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हा ही रचना बनली . ही सर्वात तरुण डोंगररांगांपैकी एक आहे. गरम असलेला शिलारस बेसॉल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन ही रचनेचा हा समूह तयार झाला आहे. हवामान आणि भूगर्भीय हालचालीमुळे यातील माती आणि इतर गोष्टी यांची धूप होऊन हे अद्भुत नैसर्गिक आश्चर्य कारक दगड उघड्यावर आले.पूर्ण जगात अश्या तीनच साईट आहेत. आयर्लंडमध्ये डेविल्स रॉक्स, कर्नाटक मध्ये मेरी आयलंड वरील रचना आणि पन्हाळ्यापाशील ही रचना. (त्यामुळे लय लांब जायला लागत न्हाई , आयर्लंड ला किंवा कर्नाटकात बघायला जाण्यापेक्षा पन्हाळ्याला जावा)
हे झालं अश्नी स्तंभ निर्मिती मागील नैसर्गिक कारण. आता येवुया इथला पारंपरिक कथाकडे.. अस म्हणतात एक लग्नाचं वऱ्हाड या ठिकाणी अचानक गायब झाला ते ठिकाण म्हणजे हे अश्नी स्तंभ.येथील लोक याला उतरंड किंवा कुआरी म्हणतात . कुआर यासाठी की याच्या शेवटाला कुआरी देवीचे जागृत देवस्थान आहे. या जागेला कुआर खिंड असे म्हणतात.
या ठिकाणी भूगोल, शिलारस, बेसॉल्ट यांचा भरपूर सखोल अभ्यास केला जाऊ शकतो. सह्याद्रीची ही भौगोलिक वैशिष्ट्ये नक्कीच पाहिली पाहिजेत.
आता जायचं कसं?
कोल्हापूर-बांबवडे-पिशवी-खोतवाडी, खोतवाडी मध्ये पोहोचल्यावर तेथे कोणालाही विचारल तरी तेथील स्थानिक लोक तुम्हाला तिकडे जायचा रस्ता दाखवून देतील.
© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १७ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा