१२ वर्षांपूर्वी मागे टाकलेली ती श्री शंभू महादेव माध्य. हायस्कुल, साळशीची पायवाट…जिच्यावरून कधी चालत, कधी सायकलवर आणि खांद्यावरच्या दप्तराच्या ओझ्याखाली स्वप्नांची पताका घेऊन आम्ही रोज निघायचो..तीच पायवाट आज पुन्हा, आठवणींचं ओझं वाहत माझ्यापर्यंत आली होती कारण निमित्त होतं , माजी विद्यार्थी मेळाव्याचं....क्षणभर पाय थबकले... डोळे बंद झाले... आणि काळ मागे सरकत गेला. २०१२… दहावी झाली. शाळा संपली.मनात धडधडणारी स्वप्नं होती, पुढे उड्डाण घेण्याची घाई होती आणि मागे राहिलं होतं ते शाळेचं दार, जिथून आयुष्य सुरू झालं होतं.आमच्या सोनवडे गावात हायस्कूल नव्हतं म्हणून शेजारच्या साळशी या गावी जावं लागायचं..कधी अंगाला झोंबणाऱ्या थंडीचा शहारा सहन करत,तर कधी उष्ण उन्हात.त्या वाटेने फक्त प्रवास नव्हता होत,तर आयुष्य घडवण्याचा एक सुंदर अध्याय लिहिला जात होता.शाळेत पोहोचल्यावर पहिली घंटा,वर्गात शिक्षकांनी धडपडून शिकवणं, आणि मधल्या सुट्टीत वाडीवरच्या मित्रांसोबत जेवणाचा डब्बा खाणं...हे सगळं आता आठवणीत जपलेलं होतं. पण वेळेच्या ओघात… सगळे वेगवेगळ्या वाटांवर निघून गेलेले.कोणी लग्न करून नव्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलं, कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी वेग वेगळ्या शहरामध्ये स्थिरावलं.आयुष्याची चक्रं एवढी भराभर फिरली की, "कधी भेटूया?" हे फक्त व्हॉट्सॲपवरचे शब्दच उरले.आणि एक दिवस अचानक, माझ्या मोबाईलवर एक आवाज हळुवार दाद देऊन गेला.आमच्या त्यावेळेच्या वर्गशिक्षक असलेले कराळे सरांचा फोन आला. “माजी विद्यार्थी मेळावा आहे १९ जानेवारीला. सर्वजण येणार आहेत. तुम्ही सर्वजण मिळून या.” ते आमंत्रण नव्हतं…ते एक प्रेमळ हाक होती.क्षणभर असं वाटलं जणू कुणीतरी भूतकाळाचं दार उघडलंय.आपल्याला भूतकाळात बोलावत आहे, परत एकदा शाळेतले क्षण अनुभवायला....क्षणभर डोळे भरून आले.मी ठरवलं – या क्षणाला पुन्हा हुकवायचं नाही.सगळं काम बाजूला ठेवलं.आठवडाभर गावी मुक्काम ठरवला आणि त्या दिवशी १९ जानेवारीला, सकाळी दहा वाजता, पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात स्वप्नांच्या त्या जुन्या सावलीत,मी पोहोचलो.हा केवळ एक रविवार दिवस नव्हता,हया दिवसाने आमच्या मनाच्या खोल कप्प्यात लपलेल्या शाळेच्या आठवणींना पुन्हा एकदा जागं केलं .जेव्हा आम्ही शाळेच्या अंगणात पाय ठेवला…तेव्हा वाटलं आमचं हरवलेलं बालपण परत एकदा आमच्याशी भेटायला आलं आहे. ती शाळेची इमारत,ती घंटा, ते ओळखीचे आवाज…सगळं काही क्षणभरासाठी थांबलेलं होतं,१२ वर्षांनंतर तेच अंगण, तोच दरवाजा, तीच भिंत... पण या वेळेस हातात पुस्तकं नव्हती, होती तर आठवणींची एक रुखरुख.असं वाटायचं की शाळेच्या भिंतींमध्ये काही तरी जिवंत आहे,जसं तिथे अजूनही आपल्या हसण्याचा, धावण्याचा, ओरडण्याचा आवाज साठवून ठेवलेला आहे.शाळेची सजावट देखणी होती –रंगरंगोटी केलेली इमारत, भव्य मंडप, खुर्च्या, मंच, आणि माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करणारा तो उत्साही माहोल ..पण त्या सजावटीपेक्षा जास्त सुंदर होतं ते वातावरण. एकत्र येणाऱ्या जुन्या मित्रांचे हसणे, डोळ्यांतून ओघळणाऱ्या आठवणी, आणि नकळत डोळ्यांत भरून येणारं पाणी. स्नेह, आठवणी, आणि पुन्हा भेटीचा आनंद..२०१२ मध्ये बंद झालेलं आयुष्याचं एक दार, २०२५ मध्ये पुन्हा एकदा उघडल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं थांबलेलं होतं...आणि त्या क्षणात काळ, वय, जबाबदाऱ्या सगळं हरवून गेलं होतं. फक्त उरलं होतं एक निखळ, निरागस भाव…"शाळा अजून तिथंच आहे... आणि आपलं बालपणही."
शाळेच्या अंगणात समोर गुरुजी दिसले. थोडंसं वय वाढलेलं, पण चेहऱ्यावरचं तेज तसंच. जणू काळाने त्यांना स्पर्श केलाच नाही.आम्ही सर्वजण एकच उत्साहाने पुढे सरसावलो, आणि त्यांना नमस्कार केला.त्या क्षणी, क्षणभरासाठी का होईना, वेळ मागे फिरला होता… मी पुन्हा हायस्कूलमधला तोच मुलगा झालो होतो.वहीच्या कोऱ्या पानात शाबासकीच्या शिक्क्याची वाट बघणारा.गुरुजींच्या नजरेत अजूनही तीच ओळख होती, तीच आपुलकी…गुरुजींचा आशीर्वाद हा केवळ अभ्यासापुरता नव्हता त्यात माणूस घडवण्याची ताकद होती. आजच्या धावपळीत, यशाच्या शोधात हरवलेली ती नजर, तो स्पर्श, पुन्हा एकदा अंतर्मनाला जागं करून गेला. काही स्पर्श शब्दांपलीकडचे असतात, आणि काही माणसं काळाच्या बाहेर जगतात.
कार्यक्रम सुरू झाला. मंचावर येऊन सूत्रसंचालन करत होते आमचे मराठीचे लाडके कांबळे सर. कधी गमतीदार विनोद करून हशा पिकवणारे, तर कधी अत्यंत गंभीरपणे विचार करायला लावणारे.त्यांची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती. आजही, त्यांच्या त्या खास शैलीत, त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला वर्गात आणून बसवलं.कांबळे सर ,मराठी आणि भूगोल शिकवायचे. पण खरं सांगायचं झालं, तर मराठी हा त्यांचा खरा श्वास होता.त्यांची भाषेवरील पकड, बोलण्यातली लय, आणि कविता सांगताना डोळ्यांतली चमक…हे सगळं पाहिलं की असं वाटायचं ,हे शिक्षक फक्त मराठी शिकवण्यासाठीच जन्माला आलेत. त्यांच्या शिकवणीत गोडवा होता आणि शुद्धतेची चुणूकही.
शिस्त म्हणजे खोराटेसर…खोराटेसर, जे आमच्या वेळचे मुख्याध्यापक होते… आणि आजही आहेत.त्यांनी शाळेच्या भविष्यासाठी दिलेलं मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी ठरलं.नेहमी कडक आणि शिस्तप्रिय असलेले खोराटे सर ,आज मात्र त्यांच्या आवाजात एक वेगळीच माया होती.खोराटेसर इंग्रजी शिकवायचे आणि इंग्रजी माझा पाचवीपासूनच आवडता विषय होता.पण या विषयावर प्रेम जडलं, ते त्यांच्या प्रभावी आणि शिस्तबद्ध शिकवणीमुळेच.सर विद्यार्थांना शिक्षा करायला कधीच मागे हटायचे नाहीत. शाळेतील शिस्त टिकवण्यासाठी त्यांची भूमिका कठोर पण अत्यावश्यक होती.ते फक्त इंग्रजी शिकवत नव्हते… ते व्यक्तिमत्त्व घडवत होते, नीतीमूल्यं रुजवत होते.त्यांच्या कडक शिस्तीमुळेच आमचं हायस्कूल पंचक्रोशीत शिस्तप्रिय हायस्कूल म्हणून ओळखलं जायचं.पण आज… त्यांच्या आवाजातली माया, डोळ्यांतली ओल, आणि विद्यार्थ्यांबद्दलचा अभिमान.हे सगळं अनुभवताना जाणवलं, की कधीकाळी ज्यांना आपण फक्त "कडक शिक्षक" समजत होतो,तेच शिक्षक आपल्या आयुष्यातील खरे शिल्पकार ठरले.खोराटेसरांनी जेव्हा सांगितलं की बिऊरकरसर, निंबाळकर सर आणि काही इतर शिक्षक लवकरच निवृत्त होणार आहेत,तेव्हा संपूर्ण मंडपात एक भावनिक लाट उसळली.त्या भावुक क्षणांमध्ये सरांनी आमच्या हायस्कूलचे संस्थापक श्री महादेव पाटील साहेब यांचा जीवनप्रवास उलगडला. शिक्षण हेच साधन मानून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा उजेड पोहोचवला.त्यांची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली नितांत प्रेमभावना यामुळेच आमचं हायस्कूल इतकं घडू शकलं. कार्यक्रमात शाळेच्या वतीने त्यांना सन्मानित करून गौरवण्यात आलं.तो क्षण म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनातल्या कृतज्ञतेचा नतमस्तक नमस्कार होता.
बिऊरकर सर आमचे विज्ञान, चित्रकला आणि पर्यावरण विषयांचे शिक्षक होते. शिकवताना ते हमखास एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा दाखला देत, त्यामुळे विषय समजायला सोपा आणि रोचक वाटायचा. त्यांच्या शिकवणीत प्रयोगशीलता होती, कल्पनाशक्ती होती.चित्रकलेतून सर्जनशीलता, विज्ञानातल्या प्रयोगांमधून जिज्ञासा, आणि पर्यावरण शिकवताना निसर्गाशी नातं जोडण्याची जाणीव हे सगळं त्यांच्या शिकवणीतून उमजायचं.
निंबाळकर सर आमचे इतिहास आणि कवायतचे शिक्षक. त्यांची शिस्त म्हणजे एक आदर्शच होता. वर्गात शिस्तीचा अंमल आणि मैदानावर कवायतीचा डौल यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या हातातली वादी एक प्रकारचा लांबट चाबूकच आणि त्याच्या शेवटी नेहमी बांधलेली शिट्टी अजूनही नजरेसमोर झळकते...माझं कवायतशी काही फारसं सख्य नव्हतं. सावधान आणि विश्राम या दोन आज्ञा सोडल्या, तर काहीच जमत नव्हतं. परिणामी दोन-तीन वेळा सकाळी पहाटे मैदानावर वादीचाही प्रसाद मिळाला! आणि त्यानंतर मी कवायतमधून गुपचूप माघार घेतली.त्यांच्या शिकवणीत एक वेगळीच ताकद होती. ती होती शिस्तीची, जबाबदारीची आणि आत्मविश्वासाची. इतिहासाचे धडे असोत किंवा कवायतीचे आदेश त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीत शिस्त आणि निष्ठा शिकायला मिळाली.सरांचा रागही आमच्यासाठी शेवटी आशीर्वाद ठरला. कारण त्यांच्या कठोर मार्गदर्शनाखालीच अनेकांनी खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
कराळे सर आठवी ते दहावीपर्यंत आमचे वर्गशिक्षक आणि गणिताचे मार्गदर्शक होते. गणित हा विषय कित्येकांना कोरडा, रटाळ आणि अवघड वाटतो पण कराळे सरांनी तो आमच्यासाठी अगदी सोपा, मजेशीर आणि आवडता बनवला होता.ते शिकवत असताना कधी एखाद्या गणिती सूत्रामागची गंमत सांगायचे, तर कधी वर्गात एखादी विनोदी गोष्ट टाकून वातावरण हलकं करत. आणि गरज असेल तेव्हा गंभीर होऊन समजावूनही सांगायचे.कराळे सरांची ती गावाकडची बोली, बोलण्याची सहज आणि आपुलकीची ढब ,त्यामुळे ते आम्हाला नेहमी "आपल्यातलेच" वाटायचे. शहरी भाषा किंवा पुस्तकातले अवघड शब्द न वापरता ते गणित अशा पद्धतीने समजावायचे की अगदी अवघड वाटणारं गणितदेखील आम्हाला समजायचं.ते केवळ शिक्षक नव्हते तर ते एक प्रेमळ मोठा माणूस ज्यांनी गणितासोबत माणूसपण शिकवलं.
असे हे आम्हाला घडवणारे, आमच्या आयुष्याचे शिल्पकार होते...ज्यांनी पुस्तकाबाहेरचं शिकवलं, माणूसपण शिकवलं, शिस्त आणि सर्जनशीलतेचा समतोल साधायला शिकवलं.आज आम्ही जे काही आहोत, त्यामागे याच शिक्षकांची शिकवण आहे प्रेमळ पण कठोर, साधी पण प्रभावी आणि म्हणूनच, त्यांच्या आठवणी कायम आमच्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भरभरून देणग्या दिल्या, अनेक भेटवस्तू दिल्या… पण खरी भेट होती ती आमच्या डोळ्यांतली ओल. बॅकग्राउंडला वाजणारी धर्मवीर चित्रपटातली "गुरुपौर्णिमा" ही भावस्पर्शी धून संपूर्ण वातावरण अधिकच भारून टाकत होती. क्षणभर असं वाटलं वेळ थांबली आहे.२०१२ मध्ये थांबलेला काळ पुन्हा २०२५ मध्ये जागा झाला होता.तेच शाळेचं अंगण, तीच घंटा… आणि चेहऱ्यांवर तीच निरागसता पण या वेळी डोळ्यांत कृतज्ञतेचा ओलसर प्रकाश होता..शाळेने आम्हाला शिकवलं, घडवलं, उभं केलं आणि जेव्हा आम्ही मोठे झालो, तेव्हा पुन्हा एकदा तिच्याच कुशीत परत आलो… एक "मुलं" म्हणून, ज्यांची मनं अजूनही तशीच आहेत.शाळा संपते, वर्ग सुटतो…पण शाळेची ही प्रेमळ साखळी ती मात्र आयुष्यभर आपल्याला मनाच्या खोल घट्ट गाठीने बांधून ठेवते.
कार्यक्रम संपल्यानंतर शाळेकडून सर्वांसाठी प्रेमाने जेवणाची व्यवस्था केली होती. पंगतीमध्ये बसताना, एकमेकांना वाढताना, हसताना , प्रत्येक क्षणात आपुलकी जाणवत होती.जेवण आटोपल्यानंतर आम्ही एकत्रितपणे आमच्या त्या वेळच्या १०वीच्या वर्गात गेलो… आणि जाऊन त्या जुन्याच बेंचांवर बसलो.त्याच बेंचांवर, जिथं कधीकाळी आम्ही स्वप्नं रंगवली होती, अभ्यासाच्या नावाखाली मस्ती केली होती, शिक्षेची भीती आणि परीक्षेचं दडपण वाटलं होतं.त्या क्षणी खरंच वाटलं आपण परत विद्यार्थी झालोय. वर्गात पुन्हा शिक्षक येऊन शिकवणी सुरू करतील, आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा तिथून चालू होईल.सगळं तसंच होतं… फक्त आपण बदललो होतो. पण त्या क्षणी, त्या जागेवर बसताना, पुन्हा आमचं विद्यार्थ्यांपण जागं झालं होतं.आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी खूप चांगल्या गप्पा मारत होतो. इतक्या वर्षांनी भेटलेली मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र, पुन्हा त्या वर्गात. बोलायला एवढं होतं, की कुणाचंच बोलणं थांबत नव्हतं. जुन्या आठवणी, किस्से, शिक्षकांच्या गोष्टी, शाळेच्या खोड्या एकेक करून सगळं उलगडत होतं.काळजाच्या तळातून येणाऱ्या आठवणी होत्या त्या.आणि प्रत्येकाच्या नजरेत एकच भावना होती हे क्षण पुन्हा मिळणार नाहीत..मोबाईल कॅमेऱ्यात एक एक क्षण जपत होतो आम्ही पण खरंतर ते आधीच मनात खोल कुठेतरी कायमचे साठवले गेले होते.
कितीही वर्षं लोटली, जग बदललं, आपण बदललो... पण शाळा नाही बदलली. ती अजूनही आपल्याला आपलीशी वाटते. दरवर्षी नव्या मुलांचं स्वागत करत करत असतानाही ती आपल्यासाठी जागा ठेवून बसलेली आहे.जणू म्हणतेय, "तुम्ही जिथून गेलात, ती जागा अजूनही तशीच आहे. आपणही कितीदा तरी म्हणतो शाळा संपली...पण खरंतर, शाळा कधीच संपत नाही. ती आपल्यात कुठंतरी खोलवर घर करून बसलेली असते ,आठवणींच्या गाभाऱ्यात."
© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे

खूप छान! अक्षय,आपला शाळेचा अनमोल ठेवा आपण जतन करू प्रभावितपणे मांडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला." हेचि देह हीच डोळा!" या उक्तीप्रमाणे आपण आपल्या शाळेच्या आठवणी, भूतकाळातल्या जागृत करून आपल्या मित्रांना व शिक्षकांना आपण प्रभावित केले.आपला भावी आयुष्य उज्वल जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांकडून आपणास शुभेच्छा व आशीर्वाद.
उत्तर द्याहटवामराठी शिक्षक:-श्रीयुत. व्ही. बी. कांबळे सर.