Father’s Day: आज त्याच्या मूक प्रेमाला आवाज देऊया…

 



आईवर भरभरून लिहिलं गेलं...
तिच्या सहवासाला, 
मायेच्या ओलाव्याला, 
तिच्या आठवणींना,
कवितांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये अगणित वेळा साजरं केलं गेलं. ती हसली, रडली, झिजली... आणि आपल्याला तिचा प्रत्येक कण उमगला.आई हे नातं नेहमी हृदयात साठवून ठेवलेलं, नेहमी बोलून दाखवलेलं... आणि ते दाखवावंसं वाटणारंही.पण याच घरातल्या एका कोपऱ्यात…कधी कपाळावर आठ्या घेऊन, कधी खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन, शांतपणे आयुष्यभर झिजणारा एक माणूस असतो , बाप!
आई दिसते, कारण ती उघड प्रेम करते.पण बाप?
तो कधी आपल्या थकलेल्या चेहऱ्यावरून ओळखला जातो, तर कधी आपल्या शांततेतून.. रागातून....
त्याने दिलेलं प्रेम फारसं कुणाला उमगतच नाही, कारण ते "मूक" असतं...कारण त्याने कधी मिठी मारून दाखवलेली नसते.
कधी सकाळी लवकर उठून डब्यात आपला आवडता पराठा टाकून देणारं आईच प्रेम लक्षात राहत पण आपल्याला वेळेत ऑफिस किंवा कॉलेजला सोडण्यासाठी झोप मोडून दारात उभा राहणारा बाप फारसा लक्षात राहत नाही...
पण म्हणून त्याचं प्रेम नसतं का?
बाप कधीच "प्रेम करतो" असं सांगत नाही...पण तो सतत करतच असतो.त्याच्या डोळ्यातले भाव आपण सहसा ओळखत नाही.कारण त्याला रडायला परवानगीच नसते…तो घराचा कणा असतो आणि कणा कधी वाकत नाहीत, असं आपण हुशार माणसं समजून बसलेलो असतो.बापाचं प्रेम व्यक्त नाही होत, पण प्रत्येक कृतीत स्पष्ट होत असतं.तो कधीही "तुला हवं ते घे" म्हणत नाही… पण जे हवं ते मुलांच्या हाती यावं यासाठी स्वतःच्या गरजा मागे ठेवतो.
कधी चुकलास तर तो रागावतो, ओरडतो...पण त्याच्या रागातही चिंता असते.कारण त्याला तुझं भविष्य जपायचं असतं.
तो थोडा कडक असतो…कारण त्याला माहित असतं की हसण्यापलीकडे एक जग आहे जे आपल्याला सहन करावं लागणार आहे.
आई शिकवते 'कसं जगावं', तर बाप शिकवतो 'जगायला लायक' कसं व्हावं.
आज जागतिक पितृदिन, Father's Day!
चला यानिमित्ताने, एकदा त्याच्या खांद्यावर हात टाकूया, त्याला मिठीत घेऊन 'I’m proud of you, बाबा' असं म्हणुया — त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटेपर्यंत...कारण तोही वाट पाहतोय ,पडद्याआडून, कुणीतरी त्याला समजून घ्यावं म्हणून.
ज्याच्या खांद्यावर बसून आपण जग पाहिलं,आज त्याच खांद्यावर प्रेमाने थोडं आपलं जग उतरूया.

© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 15 जून  2025

तो दिवस...ज्या दिवशी रायगडावर सिंहासन नाही, स्वराज्य उभं राहिलं!"


आज ६ जून...
हा कोणताही साधा दिवस नाही,
हा दिनांक फक्त दिनदर्शिकेतील एक पान नाही...
हा आहे तो दिवस,
ज्या दिवशी मातीने सिंह घडवला —
आणि त्या सिंहाने त्या मातीतच स्वराज्याचं बीज पेरलं!
आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन —
फक्त सिंहासनावर बसलेला एक राजा नव्हे,
तर जनतेच्या हक्काचं सामर्थ्य बनलेला ‘स्वराज्याचा शिल्पकार’.
त्या दिवशी रायगड फक्त किल्ला नव्हता... तो अख्खं मराठ्याचं स्वप्न होता!
गर्जना होत होत्या वेद मंत्रांच्या,
ढोल-नगाऱ्यांचा नाद आसमंतात दुमदुमला होता.
पण... त्याहीपेक्षा प्रचंड आवाज होता,
जनतेच्या डोळ्यातून झरणाऱ्या अभिमानाच्या अश्रूंनी साकार झालेल्या त्या "राजा"चा!
"शिवाजी राजा झाला....
जिजाऊंच्या पोटी जन्मलेला तो शिवबा...
हजारो रात्र जागून एक आईने संस्कारांचं लेकरू घडवलं,
आणि एक दिवस त्या लेकरानं
मुघलांच्या महालांना हादरवून ‘स्वराज्य’ प्रस्थापित केलं!
शिवबा सिंहासनावर बसला, पण त्याच्या डोळ्यात अंहकार नव्हता...
त्याच्या मनात फक्त एक विचार होता – माझ्या माणसांसाठी, माझ्या मातीतून, माझ्या धर्मासाठी न्यायाचं राज्य उभं करणं.
हा राज्याभिषेक नव्हता, हा शपथविधी होता.
शपथ होती –
"मी राजा आहे, पण माझं राज्य हे प्रजेचं आहे...
मी सिंहासनावर बसलो असलो, तरी स्वराज्याचा पहिला सेवक आहे!"
असं बोलणारा राजा? नाही, तो केवळ राजा नव्हता…
तो होता जनतेच्या हक्कांसाठी तलवार उपसणारा संतराजा!
सत्तेच्या शिखरावर जाऊनही अभिमानाचा अणुकणही न दाखवणारा,
पण मावळ्याच्या घामाला राजसन्मान देणारा!
कोणत्या बादशहाने दिला असा त्याग?
कोणत्या सुलतानाच्या रक्तात होतं असं आत्मभान?
हा विचार फक्त आणि फक्त —
छत्रपती शिवाजी महाराजांचाच!

एका झाडाचा आक्रोश

           

स्थळ: गावाच्या माळावर उभं असलेलं एक जुने, विशाल झाड. आज त्याला तोडण्यासाठी माणसं आलेली आहेत. कापण्याआधी, झाड एक शेवटचा आक्रोश करतं... विनवण्या करत....आजुबाजूला जैवविधता गोंधळलेली , सैरभैर आणि घाबरलेली असते... 
 
झाड: थांब रे माणसा!
कुठे चाललास तू? 
कसली घाई आहे एवढी? 
आणि हे हातात काय आहे ? कुऱ्हाड!🪚 ( कुऱ्हाडीचा लाकडी दांड्याने शरमेनं मान टाकलेली असते) 
माझ्या फांद्यांवर बसलेली ही वाऱ्याची झुळूक…
आज घाबरून गेली आहे ,भीतीने गप्प झालीय, 
बहुतेक मला पडताना बघायची तिच्यात हिम्मत राहिलेली नाही...
ही बघ ! ही माझी पाखरं 🕊️ आहेत… 
त्यांच्या पिल्लांची चिवचिव ऐकतोयस का? 
येतेय का ऐकायला तुला ? 
की तू पण व्यवस्थेसारखा बहिरा झाला आहेस ? 
त्यांना माहित नाही की आज त्यांचं घर 🪺 उद्ध्वस्त होणार आहे… 
त्यांच्या डोळ्यांत भीती आहे… 
आणि तू… 
तू कुठल्या विकासाची भाषा करतोस?
मी जेव्हा रुजलो होतो, 
तेव्हा या जमिनीला नवा श्वास मिळाला होता .
मी वाढलो, मोठा झालो, 
हजारो जीवांचं आधारस्थान झालो…
आज तू मला तोडतोस? 
कोणासाठी? 
विकासासाठी? 
तो विकास काय उपयोगाचा, 
जेव्हा अंगणं उजाड होतील, 
आणि मनं काळोखीने भरून जातील?
तुला मला तोडायच आहे ना ? 
मग तोड तर .… 
पण एकदा माझ्यात डोकावून बघ… 
माझ्या आड लपलेले पाखरांची घर, 
त्यांची निरागस पिलं, 
माझ्या फळा पानावर जगलेले पशू पक्षी. 
कित्येकांच्या संसाराचा आधारवड आहे मी..
हे सगळं माझ्यात सामावलेलं आहे. 
मी केवळ लाकूड नाही… 
मी एक सजीव आहे, श्वास घेणारा..तुझ्यासारखाच !  
तुला जगवणारा, तुला प्राणवायू देणारा ! 
आज तू मला तोडशील… 
उद्या तू पाण्यासाठी रडशील…
माझं सावली गेली की उन्हाने जळशील…
पावसासाठी डोंगर🗻 गाठशील, 
पण तिथे ढग 🌧️ नसतील….
कारण त्यांना रोखून धरणारा मी तिथे नसेल.
माझं एकदा दुःख जाणून बघं… 
एकदा डोळ्यांत बघं माझ्या…एकदा त्या निष्पाप पशु पक्षाचा आक्रोश
बघ, मी अजून गप्प आहे, कारण मी झाड आहे…आता माझे पशु पक्षी निसर्गरुपी न्यायालयात जातील. तक्रार करतील... न्यायनिवाडा करतील...तेव्हा माझ्या मरणाने निसर्गरूपी न्यायालय बोलू लागेल…आणि तो जेव्हा शिक्षा सुनावेल....तेव्हा...त्याने सुनावलेली शिक्षा तुझ्या गर्जनेपेक्षा, तुझ्या अस्त्रशस्त्रपेक्षा,कैक पटीने भयंकर आणि मोठा विध्वंसक असेल. मग मी पण बघतोच आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली तुला कोण कोण वाचवायला येतोय... 
 

दरवळत्या आंब्यांतून गाव आलं भेटायला

     
           
                गावाकडच्या घराच्या दारात उभं असलेलं आमचं आंब्याचं झाड… उन्हाळ्याचं आगमन झालं की ते आपोआप बहरायचं – जणू वर्षभर साठवलेलं प्रेम त्या फळांतून व्यक्त करायचं. त्या झाडाला ऋतूंची गणितं कधी समजवावी लागत नव्हती – त्याचं वेळेवर उमलणं आणि भरभरून फळणं.प्रत्येक मे-जून महिन्यात ते झाड भरभरून आंबे देतं – न थकता, न मागता. जणू आईचं प्रेमच  ते – सतत, शाश्वत आणि निस्सीम आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे यावर्षीही आईनं गावाहून पाठवलेली ती आंबे भरून पाठवलेली गोणी
            मात्र, यावर्षी आंब्यांचा प्रवास थोडा वेगळा होता. माझ्या गावातून – आईच्या हातून निघून – सासुरवाडीत..... तिथून मेहुणीकडे... आणि अखेर डोंबिवलीच्या गार्डा सर्कलला माझ्या हातात. सकाळी सुरू झालेला हा प्रवास रात्री १२ वाजता संपला – एकदम धावत्या लोकलसारखा.
         रूममध्ये आल्यावर आंब्यांचा तो पहिला वासच पुरेसा होता – गावाची आठवण जागवायला. आईनं प्रेमाने निवडून दिलेले ते मोजके आंबे...त्यात ममतेचा सुगंध होता.
यानंतरचा पुढचा प्रश्न होता – "आंबे पिकायचे कसे?"
ही मुंबई! इथे गवत कुठं मिळणार? आणि पिंजर कोणाजवळ असणार? गावात ही कामं अगदी सहज पार पडायची.तेव्हाच आमच्या बायकोनं थोडं डोकं लावलं – आणि तांदळात आंबे ठेवले पिकवायला.गावात जसं पिंजर, तसंच इथे – आमचं ‘तांदळाचं पिंजर’.गावाची पद्धत, मुंबईच्या घरात अवतरली होती… एका साध्या कल्पनेतून! पिकवायला ठेवल्यावर रोजचं तेच,कधी पिकतील?  कधी तो वास दरवळेल?  कधी पहिला घास तोंडात जाईल? दररोज आंब्यांकडे नजर जायची, पिकलेत का? अजून किती वाट पाहायची? या विचारांनी मन ओतप्रोत भरून जायचे.आणि मग तो दिवस येतो .आंबे खरंच पिकले होते. हातात घेतले, हळुवार सोलले... आणि त्या पहिल्याच घासात गावाचा गंध त्या एका चवेत मिसळलेला वाटला. माझी लहानपणापासूनची सवय — आंबे पोटभर खाण्याची आणि आजही, त्याच समृद्धीचा अनुभव घेतला
     मुंबईत राहत असलो, तरी आंब्यांची ही पेटी आली की वाटतं – गावानं स्वतःहून दार ठोठावलंय. गावचं दारात आलंय, गंधानं ओळखून, प्रेमानं जवळ बसायला, गप्पागोष्टी करायला.आईच्या हातून निघून आलेली ती गोणी भरून आंबे... त्यात आंब्यांची चव होतीच, पण त्याहून जास्त होती आईच्या मायेची चव !


© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 04 जून 2025