गावाकडच्या घराच्या दारात उभं असलेलं आमचं आंब्याचं झाड… उन्हाळ्याचं आगमन झालं की ते आपोआप बहरायचं – जणू वर्षभर साठवलेलं प्रेम त्या फळांतून व्यक्त करायचं. त्या झाडाला ऋतूंची गणितं कधी समजवावी लागत नव्हती – त्याचं वेळेवर उमलणं आणि भरभरून फळणं.प्रत्येक मे-जून महिन्यात ते झाड भरभरून आंबे देतं – न थकता, न मागता. जणू आईचं प्रेमच ते – सतत, शाश्वत आणि निस्सीम आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे यावर्षीही आईनं गावाहून पाठवलेली ती आंबे भरून पाठवलेली गोणी
मात्र, यावर्षी आंब्यांचा प्रवास थोडा वेगळा होता. माझ्या गावातून – आईच्या हातून निघून – सासुरवाडीत..... तिथून मेहुणीकडे... आणि अखेर डोंबिवलीच्या गार्डा सर्कलला माझ्या हातात. सकाळी सुरू झालेला हा प्रवास रात्री १२ वाजता संपला – एकदम धावत्या लोकलसारखा.
रूममध्ये आल्यावर आंब्यांचा तो पहिला वासच पुरेसा होता – गावाची आठवण जागवायला. आईनं प्रेमाने निवडून दिलेले ते मोजके आंबे...त्यात ममतेचा सुगंध होता.
यानंतरचा पुढचा प्रश्न होता – "आंबे पिकायचे कसे?"
ही मुंबई! इथे गवत कुठं मिळणार? आणि पिंजर कोणाजवळ असणार? गावात ही कामं अगदी सहज पार पडायची.तेव्हाच आमच्या बायकोनं थोडं डोकं लावलं – आणि तांदळात आंबे ठेवले पिकवायला.गावात जसं पिंजर, तसंच इथे – आमचं ‘तांदळाचं पिंजर’.गावाची पद्धत, मुंबईच्या घरात अवतरली होती… एका साध्या कल्पनेतून! पिकवायला ठेवल्यावर रोजचं तेच,कधी पिकतील? कधी तो वास दरवळेल? कधी पहिला घास तोंडात जाईल? दररोज आंब्यांकडे नजर जायची, पिकलेत का? अजून किती वाट पाहायची? या विचारांनी मन ओतप्रोत भरून जायचे.आणि मग तो दिवस येतो .आंबे खरंच पिकले होते. हातात घेतले, हळुवार सोलले... आणि त्या पहिल्याच घासात गावाचा गंध त्या एका चवेत मिसळलेला वाटला. माझी लहानपणापासूनची सवय — आंबे पोटभर खाण्याची आणि आजही, त्याच समृद्धीचा अनुभव घेतला
मुंबईत राहत असलो, तरी आंब्यांची ही पेटी आली की वाटतं – गावानं स्वतःहून दार ठोठावलंय. गावचं दारात आलंय, गंधानं ओळखून, प्रेमानं जवळ बसायला, गप्पागोष्टी करायला.आईच्या हातून निघून आलेली ती गोणी भरून आंबे... त्यात आंब्यांची चव होतीच, पण त्याहून जास्त होती आईच्या मायेची चव !
© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 04 जून 2025

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा