शाहूवाडी तालुका — निसर्गाच्या कुशीत विसावलेला, हिरव्यागार डोंगररांगांनी सजलेला, आणि वर्षानुवर्षे भातशेतीला ओलावा देणारा. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत येथे पावसाचं प्रमाण अधिक. त्यामुळे इथली मातीही खास – भातासाठी साजेशी, काळी आणि सुपीक.पावसाचे पहिले थेंब जिथे हळुवारपणे जमिनीवर पडतात, तिथे नुसतं पाणीच नव्हे, तर आशाही अंकुरते. पण यंदा पाऊस काहीसं वेगळंच गीत घेऊन आला आहे – सूरही वेगळा आणि तालही वेगळा.
मे महिन्यातच ऐन पेरणीच्या वेळी पावसाने बळकट हजेरी लावली. जणू आभाळातून संयम सुटल्यासारखं वाटावं आणि काळजीचं धुकं शेतकऱ्याच्या मनावर उतरावं. या आधी जूनमध्ये येणाऱ्या पावसाच्या स्वागतासाठी शेतकरी सज्ज असायचा, पण यावेळी पावसाने वेळेआधीच "नमस्कार" केला आणि शेतकऱ्याच्या मनात प्रश्नांची वावटळ सुरू झाली.
"तयारी अपुरी, माती ओली, आणि मनात धाकधूक....."
भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी मे महिन्यातच सुरु व्हायची.यंदा मात्र पाऊस आधीच आला आणि पेरणीस सुरुवात करता आली नाही.अनेकांच्या मेहनतीची घडी विस्कटली, तर काहींनी तयारीच्या सुरुवातीलाच थांबावं लागलं.
आता प्रश्न उभा राहतो – असाच पाऊस अजून काही दिवस सुरु झाला तर? कदाचित पेरणीचा टप्पा वगळून थेट रोपलावणीच करावी लागेल. या सगळ्यात मोठा प्रश्न शासन कितपत सोबत असेल.आजवर अनेकदा अनुभव आलाय – नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी उभा राहतो आपल्या हिमतीवर, पण मदतीच्या नावाखाली फक्त फॉर्म भरून, आश्वासनं ऐकून थांबावं लागतं.कर्जमाफीचं सरळ गणित उद्योगपतींसाठी लागू होतं, पण शेतकऱ्यांसाठी मात्र ते अजूनही गुंतागुंतीचं समीकरण आहे.शेतकऱ्याचं आयुष्य हेच – काळजावर दगड ठेवून मातीशी नातं टिकवनं.
शाहूवाडीचा शेतकरी आजही आपल्या मातीशी नातं सोडत नाही – कारण त्याला माहीत आहे, की संकटं येतात आणि जातात...पण आता केवळ निसर्गाशी नव्हे, तर शासनाशीही एक प्रामाणिक अपेक्षा आहे – "आम्हाला फक्त मदतीच्या जाहिराती नकोत, कृती हवीय.कारण भाताच्या रोपात केवळ धान्य नसतं, तर लाखो शेतकऱ्याची स्वप्नं रुजलेली असतात."
यावेळी पाऊस वेळेआधी आला, पण...
शासनाची मदत वेळेवर येईल का?
आज हवामान निसर्गानं बदललंय, पण आता शासनानेही धोरणं बदलून मदतीचा हात अधिक सढळपणे पुढे करायला हवा.
© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि.29 मे 2025




