ही केवळ एक दिनांक नाही,
ही आहे अस्मितेची आठवण,
गर्वाची जाणीव, आणि आपल्या मराठी मातीतल्या माणसांच्या शौर्याची बलिदानाची साक्ष !
"दिल्लीचे ही तक्त राखी" – ही ओळ उच्चारली की काळजाच्या खोल तळातून एक आवाज येतो,
"हो! हा महाराष्ट्र माझा आहे!"
हा तोच महाराष्ट्र आहे...ज्याने आदिलशाही, मुघलशाही, इंग्रजशाही झुगारून 'स्वराज्य' उभारलं.
ज्याने शत्रूंच्या सिंहासनाला हादरवलं, आणि न्यायाचं राज्य उभारलं.
जिथं तलवारीच्या टवटवीत धारेत इतिहास कोरला गेला,आणि गडकोटांवर स्वराज्याची पताका फडफडली.
जिथं बाळ गंगाधर टिळकांची असंतोषाची ठिणगी पेटली आणि लोकमान्य झाले.
जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, समता, आणि शिक्षणाचा मशाल पेटवला.
पण या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीही एक संघर्ष होता,एक आंदोलन होतं,आणि १०७ हुतात्म्यांचं रक्त सांडलं होतं!हो, आजचा हा महाराष्ट्र १०७ हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा आहे.ते लढले, कारण त्यांना हवी होती एक भाषा, एक संस्कृती, एक ओळख –
"मराठी माणसाचा महाराष्ट्र!"
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले हे वीरगोळ्यांच्या वर्षावातही मागे हटले नाहीत.त्यांच्या रक्तानं या मातीला पवित्र केलं…आणि म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो –
"हा महाराष्ट्र माझा आहे!"
आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही,तर ते बलिदान आठवून, नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचा आहे.शपथ घेण्याचा दिवस आहे,की हा महाराष्ट्र आपण तसाच राखू, जसा छत्रपतींनी घडवला, आणि शहिदांनी जपला!
जय महाराष्ट्र!
शिवरायांचा अभिमान – महाराष्ट्र!
© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १ मे २०२५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा