शहरातली जांभळं...., गावाची आठवण


                        आज सकाळी ऑफिसहून घरी जाताना, ठाणे (पश्चिम) रेल्वे स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला जांभळं विकणारी काही माणसं दिसली. तिथे जाऊन जमेल तसं भाव करत ५० रुपयांची जांभळं घेतली. घरी आल्यावर ती धुत असताना डोळ्यांसमोर एक वेगळीच दुनिया उभी राहिली – बालपणाची, गावाकडची, आणि त्या रानमेव्याची! रानमेवा हा लहानपणापासून माझ्या मनाच्या फार जवळचा विषय. त्याचं आकर्षण इतकं की, एखादं जाभळं,करवंदं बघितलं की आतून एक हुरहूर दाटून येते.अगदी लहानपणीची आठवण करून देते.

          आमच्या घराच्या बाजूलाच एक भलंमोठं जांभळाचं झाड होतं. एखाद्या सन्माननीय वृद्धासारखं ते झाड आमच्या बालपणीचं साक्षीदार होतं.मे महिना उजाडला की झाडावर काळसर-जांभळ्या रंगाचं सौंदर्य खुलायला लागायचं. वाऱ्याच्या झुळकीनं रात्रभर झाडाखालचं अंगण जांभळांनी सजलेलं असायचं. सकाळी उठल्यावर चहापेक्षा आधी आमचं लक्ष असायचं त्या झाडाकडे "आज किती जांभळं पडली असतील?" हा प्रश्नच आमच्या सकाळी उत्सुकतेचा भाग व्हायचा. आम्ही भावंडं, मिळून स्पर्धा लावायचो . कुणाला किती गोड आणि किती मोठी जांभळं मिळतात. एकेका जांभळासाठी किती धावाधाव, कधी हसणं, कधी किरकिर, तर कधी कधी एकमेकांच्या पिशवीमधून चोरून जांभळं काढण्याची गंमत!

              लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत निकाल लागला की माझं मामाच्या गावाला – पिशवीला – जाणं फिक्स असायचं. पिशवीला लागूनच डोंगर, समृद्ध वृक्ष संपदा होती, आणि त्यामुळे करवंदं आणि जांभळांची रेलचेल असायची.भावंडांच्या सहवासात त्या रानमेव्याचा स्वाद वेगळाच लागायचा. झाडावर चढून करवंदं तोडायची, किंवा रानात भटकत भटकत गोडसर जांभळं सापडली की त्यावर तुटून पडायचो. खऱ्या अर्थानं मे महिन्याच्या सुट्ट्या त्या चवीनीच गोड व्हायच्या.
              तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की एक दिवस ते जांभळाचं झाडच राहणार नाही.वर्षानुवर्षं गेली… त्या झाडाखाली खेळणारी पिढी मोठी झाली....आणि त्या आठवणींना एक हळवी किनार लागली.
               मुंबईसारख्या शहरात जांभळं विकत घेऊन खावी लागतात – पण त्यात गावासारखा गोडवा कधीच सापडत नाही. कारण त्या जांभळांमध्ये आमच्या बालपणीच्या खेळाचा, श्रमाचा, आणि आनंदाचा स्वाद मिसळलेला असायचा.आज जांभळं बघून मन भरून आलं.गाव सोडलं... झाड गेलं... पण त्या झाडाखालील लहान मुले अजूनही मनात कुठेतरी धावत असतात. जांभळं वेचण्यासाठी... आणि आठवणींना जपण्यासाठी....

© अक्षय पाटील, सोनवडे | दि.२३ मे २०२५

४ टिप्पण्या: