अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी

 🌿 अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी 🌿

      कधी कधी आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतं… एक क्षण असतो, आणि सगळं उलथून जातं.

             परवा एक बातमी अशी आली की काळजावर खोल जखम करत गेली — आमची मोठी मावशी, घरातली, नात्यातली एक ऊबदार सावली,अचानकच आमच्यातून निघून गेली.ती गेली… आणि आयुष्य थोडंसं स्तब्ध झालं.जणू काळाने थोडावेळ थांबावं, असं काहीसं क्षणभर वाटून गेलं. ती नेहमीसारखीच होती — हसरी, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी. आणि एक दिवस अचानक… ती नाहीशी झाली. शब्दांत न मावणारी पोकळी निर्माण करून आयुष्याच्या धावपळीतला एक Permanent आधार अचानक निखळला.

         मावशी केवळ नात्याने मावशी नव्हती, ती आमच्यासाठी दुसरी आई होती.लहानपणापासून तिचं प्रेम, तिचं हसणं, प्रत्येक सणात तिचा गोड आवाज — सगळं सगळं आठवतंय.आणि आता या आठवणींच्या गर्दीत एक सल मनात घर करून बसली आहे..

              मावशीचं एक ऑपरेशन होणार होतं. ते झाल्यावर मी तिला भेटायला गावी जायचं ठरवलं होतं — दोन दिवसासाठी तरी.माझ्याही मनात काही शंका नव्हती, वाटलं,साधं ऑपरेशनच तर आहे, होऊन जाईल नीट.शनिवारची सुट्टी होती, पण कुठंतरी कंटाळा आला, विचार केला ऑपरेशन झालं की पुढच्या शनिवार, रविवार गावी जाऊन मावशीला भेटायचं. आज त्या क्षणाची आठवण येते तेव्हा काळजावर ओझं येतं .गेलो असतो, तर शेवटचं पाहता आलं असतं… एखादा शब्द, एखादं हास्य, एक साश्रु मिठी… ती क्षणभराची भेट आयुष्यभर पुरली असती. पण तो क्षण निसटून गेला, कायमचा.भेटीपासून मी स्वतःलाच वंचित ठेवलं. ही सल — ही जन्मभर लक्षात राहणारी, बोचणारी गोष्ट बनून गेली आहे. माफ कर, मावशी मला शेवटच्या क्षणी तुझ्या सोबत न राहता येणं ही माझी चूक होती… पण मनापासून सांगतो, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.

            आयुष्यात आपण किती गोष्टी "नंतर बघू", "उद्या करू" म्हणत टाळतो. पण मृत्यू कुठलाही अलार्म लावून येत नाही… तो येतो अचानक आणि आपण उभे राहतो पोकळपणे त्या क्षणासमोर.माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी उरतात, आणि त्या आठवणींच्या मागे आपण कित्येक "काय झालं असतं जर..." असे प्रश्न घेऊन जगत राहतो.

        मावशीची उणीव शब्दांत मावळणारी नाही. ती नसणं आज घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतं. पण तिचं प्रेम, तिच्या आवाजातली माया, तिचा काळजीचा सूर, तिचं विचारणं — “तू आणि सुषमा चांगलं आहेसा का रे?” हे सगळं आठवलं, की डोळ्यांच्या कडा ओलावतात. हे सगळं कायमच्या आठवणीत साठवून ठेवलंय. आम्ही सगळे अजूनही तिच्या आठवणींमध्ये हरवलेले आहोत. तिचं असणं आमच्यासाठी आशीर्वाद होतं, एक हक्काच सपोर्ट सिस्टीम होती आणि तिचं जाणं — जे कधीच भरून निघणार नाही.

                मावशी, तू गेलीस… पण तुझ्या आठवणींनी, तुझ्या मायाळू आवाजाने, प्रेमळ साध्या स्वभावाने आणि प्रत्येक वेळेस पाठीशी उभं राहण्याच्या तुझ्या सवयीने एक अमिट ठसा सोडून गेलीस. आमच्या गावच्या यात्रेत तुझं शेवटचं हास्य, शेवटचं बोलणं… आता फक्त आठवणींच्या धाग्यांत गुंफावं लागणार.कधी भेट होईल का पुन्हा, माहित नाही… पण एक मात्र नक्की — तुझी आठवण रोज मनाच्या पानांवर अलगद उतरते… आणि डोळ्यांच्या कडांवर थांबून राहते.

💐 श्रद्धांजली मावशी… तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद, कायम आमच्या सोबत राहील…

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. ७ मे २०२५

३ टिप्पण्या: