ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग

ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग


       पहेलगाव... जिथे सकाळचं सूर्योदय न दिसता, काळोखाचं भेसूर रूप पहाटेच दाटून आलं. जिथे मायेच्या कुशीत असणाऱ्या लेकरांच्या गालांवर हास्य नव्हतं, तर भीतीचा थरकाप होता. जिथे एकाच क्षणात घरांतील स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्रं ओझं बनली.अखंड भारतवासियांना त्या दिवशी दुःखाच्या सावलीत उभं राहावं लागलं.

      तो हल्ला केवळ बंदुकांचा नव्हता तर तो हल्ला होता संपूर्ण भारतमातेच्या सत्त्वावर !पण भारत झुकत नाही... भारत क्षमा करतो, पण विसरत नाही! त्या अश्रूंनी जेव्हा राष्ट्राच्या काळजाला चिरलं, तेव्हा भारताने आपल्या संयमाच्या सीमांना मागे टाकत प्रतिशोधाचा रणसंग्राम छेडला — ऑपरेशन सिंदूर!

          ही  केवळ लष्करी कारवाई नव्हती, हा शपथविधी होता.ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ शत्रूला प्रत्युत्तर नव्हे, तर त्या प्रत्येक सतीच्या शापाला उत्तर होतं. त्या फुटलेल्या मंगळसूत्रांचं, भिरभिरणाऱ्या नजरेच्या लेकरांचं, आणि मातृत्वाच्या चिरडलेल्या हुंदक्यांचं प्रतिघोष होता – हा प्रतिशोध नव्हे, हा न्याय होता!

"तुम्ही आमचं कुंकू पुसलं, आम्ही तुमचा गर्व उद्ध्वस्त केला!" या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांच्या छातीत भयाचं वादळ उठवलं, तर देशवासीयांच्या रक्तात पुन्हा आत्मसन्मान, अभिमान उसळून आला.

            आज आपली जबाबदारी आहे – जागृत राहणं, एकदिलाने उभं राहणं, आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करणं.कारण जे सैनिक सीमेवर झगडतात, त्यांच्या पाठिशी उभं राहणं, हेच खरं देशप्रेम. "कुंकवासाठी चाललेलं हे युद्ध, प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतमातेचं कुंकू जपण्यासाठीचं आहे."

शब्द संपतील, पण शौर्याचं स्मरण कधीच संपणार नाही.

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १० मे २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा