ग्रामपंचायत निवडणूक

 गावागावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. आपल्या गावात यंदा सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे स्पष्टपणे जाणवतं की आता स्पर्धा जास्त तीव्र होणार आहे. परंतु या स्पर्धेचं स्वरूप काय असावं, यावर थोडं चिंतन करणं आज गरजेचं आहे.
        आज अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न बनून बसलेला आहे. "माझा माणूस सरपंच झाला पाहिजे", "आपलं वर्चस्व टिकलं पाहिजे", "दोन दिवस गावभर बॅनर लावून नाव चमकवलं पाहिजे" एवढ्यावरच मर्यादित राजकीय आकांक्षा आहेत. हे पाहता, सरपंच पदाचा वापर विकासासाठी झाला पाहिजे की केवळ आत्मप्रौढीसाठी, हा प्रश्न अधिकच टोकदार होतो.अनेकदा गावात रस्ते असोत, पाणीपुरवठा असो, गटारी असोत किंवा गावकुस सुधारणा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निवडणूक म्हणजे फक्त मांडव, पोस्टर, जेवणावळी, आणि जातीय समीकरणं याच्यातच सारी शक्ती खर्च होते.
        ज्यांना आपण ‘माझी माणसं’ म्हणून निवडून देतो, त्यांपैकी कितीजणांना खरंच ग्रामपंचायत कायद्याचं, निधी वितरणाचं किंवा ग्रामसभेचं स्वरूप माहिती असतं?
एका संशोधनानुसार, सुमारे ८० टक्के सरपंचांना ग्रामपंचायतीची मूलभूत माहितीही नसते. मग असे लोक गावाचा विकास नेमका कसा करणार?
सरपंच पदावर बसणं म्हणजे 'मी किती मोठा आहे' हे दाखवण्याची जागा नाही, तर 'गावात काय मोठं करायचं आहे' याचा विचार करण्याची जागा आहे.
ही संधी आहे:
१.नव्या पिढीला योग्य सुविधा मिळवून देण्याची.
२.पारदर्शक कारभार रुजवण्याची.
३.शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोचवण्याची.
४.गावात समाजिक सलोखा प्रस्थापित करण्याची.
       यासाठी ज्यांना आपण उमेदवारी देतो, त्यांनी केवळ ‘सर्वसामान्य महिला’ म्हणून नव्हे, तर सुशिक्षित, समजूतदार, स्वप्न बाळगणाऱ्या महिला म्हणून समोर यावं, हीच खरी अपेक्षा.
         गावचा कारभार हा नात्यांवर, जातीतल्या मतांवर किंवा दबावांवर चालणार असेल, तर गाव तिथंच थांबेल. पण जर सरपंच पद ही एक सामाजिक बांधिलकी समजून घेतली, तर तोच गाव उन्नतीकडे झेप घेईल."एक सरपंच गाव बदलू शकतो, पण केवळ तेव्हाच जेव्हा त्याचं ध्येय स्वतःचा झेंडा फडकवण्याचं नसून गावासाठी दिवा लावण्याचं असेल."
          आज गावातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराने विचार करायला हवा की, आपण कोणाला आणि का निवडून देतो? निवडणूक म्हणजे आपलं भवितव्य ठरवणारा क्षण असतो, केवळ शेजारी किंवा नातेवाईक म्हणून कोणाला पुढे करणार असू, तर आपला विकास आपल्याच हातांनी गहाण ठेवत आहोत.एक जागृत गावकरी म्हणून विचार करायला हवा की *सरपंच पदासाठी लढणं प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर गावाच्या प्रगतीसाठी असावं.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा