शिक्षणातून संस्कार घडवणारे मगदुम सर


               २००६ ते २००७ या काळात आमच्या विद्या मंदिर सोनवडे शाळेत कार्यरत असलेले मगदुम सर ,एक समर्पित, प्रेमळ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व.आमच्या सोनवडे शाळेत सरांचा कार्यकाळ फक्त एक दीड वर्षाचाच.सरांच्या काळात शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे ठिकाण नसून एक संस्काराची कार्यशाळा असायची.प्रत्येक उपक्रमामध्ये सरांचा विचार आणि त्यांची जिद्द स्पष्ट दिसायची.मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो, सामाजिक उपक्रम असो किंवा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण जागवण्याचे प्रयत्न सर नेहमी पुढे असायचे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जबाबदारी आणि सामाजिक भान यांचा संगम अनुभवला."शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे, तर आदर्श नागरिक घडवणे आहे,"हे सरांनी कृतीतून दाखवून दिले होते. याच सरांच्या काळात आम्ही कधी नव्हे ती उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. विज्ञान प्रदर्शनात डझनभर ट्रॉफ्या जिंकून संपूर्ण गावभर जल्लोषात विजयाची मिरवणूक काढली होती.त्यांच्या प्रेरणेमुळेच त्या काळात मला शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळण्याचा सन्मान लाभला होता जो माझ्यासाठी आजही अमूल्य आठवण आहे.आजही सरांचा आवाज, त्यांचा प्रसन्न चेहरा आणि त्यांची शिकवण आमच्या मनात जिवंत आहे.

           आणि आज जेव्हा समजले की मगदुम सरांची पिशवी केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी निवड झाली आहे, तेव्हा मन अभिमानाने भरून आलं..ही निवड म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमांना, निष्ठेला आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाला मिळालेला योग्य सन्मान आहे.अशा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी रुजलेले संस्कार ही आमच्यासाठी आयुष्यभर जपावी अशी शिदोरी आहे.

🙏 हार्दिक अभिनंदन मगदुम सर!

आपली शिकवण काळाच्या प्रवाहातही अमर राहो हीच आमची मनापासून प्रार्थना. 🌺


© अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे 

Mob.No.9881424551

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणासाठी लागू केलेलं हैदराबाद गॅझेट पाहायचं आहे का?

तुमच्यासाठी मूळ गॅझेट इथे उपलब्ध आहे!

नावावर क्लिक करा आणि डाउनलोड करा:Haidrabad gazetteer

मायमाऊलीच्या हातची शिदोरी



मायमाऊलीच्या हातची शिदोरी... 
दोन घासात पोट भरते, 
पण मनात मात्र लढ्याची ज्वाला पेटवते. 
मराठा आंदोलनाच्या रणांगणावर आलेली ही साधी भाकरी नाही, ती मातृप्रेमाचा संदेश आहे, आशीर्वादांची उब आहे आणि विजयाची खात्री आहे. कारण या भाकरीत फक्त पीठ नाही, तर मायमाऊलीच्या हृदयातील श्रद्धा, अपार प्रेम आणि आपल्या लेकरांच्या भविष्यासाठीची आर्त हाक यात सामावलेली आहे.
#मराठा आरक्षण 🚩🚩
🚩


✍️अक्षय पाटील ,कोल्हापूर

"माझ्या लेखणीतून...."


        पुरे झाले आता...या अन्यायाच्या रणांगणात आज मला माझ्या लेखणीला तलवारीची धार द्यायची आहे.गप्प बसणं आता शक्य नाही कारण बाकीची पिलावळ आता वळवळ करत सुटली आहे.या अन्यायाच्या रणांगणात मला लेखणीतून आवाज उठवायचा आहे आणि जो जो आमच्या मराठा समाजाच्या हक्कांच्या आड येईल, विरोध करेल, त्याची फक्त शब्दांनीचं आर-पार चिरफाड करायची आहे.           
             आम्हाला डोकं टेकवायला लावायचं स्वप्न पाहणाऱ्यांनो,कान उघडे ठेवा.मराठा कधीच झुकणार नाही! आमचा इतिहास ज्वालामुखीसारखा ज्वलंत असा आहे आणि आम्ही त्याचं ज्वालेतून जन्मलोय.आमचा संघर्ष आमच्या अभिमानासाठी ,स्वाभिमानासाठी आहे आणि जाणून बुजून जर कोण चुकीचं करत असेल,आमच्या लढ्याला बदनाम करत असेल,आमच्या अभिमानाला, स्वाभिमानाला डाग लावत असेल तर त्याची माय या लेखणीच्या प्रत्येक अक्षरात असेल हे लक्षात ठेवा.आमच्या हक्कांवर डाका घालणाऱ्यांची झोप आम्ही लेखणीच्या धारदार शब्दांनी उडवून टाकू.
       आम्ही शांततेत होतो,म्हणून तुम्ही उधळत आहात,पण आता आमची लेखणी पेटली आहे,शब्द लाल बुंद अंगार झाले आहेत आणि हा लेखणीचा विद्रोह थांबणार नाही जोपर्यंत मराठ्यांचा विजय होत नाही!.
       आज माझे शब्द केवळ लेखन करणार नाहीत तर आता लढणारही आहेत.🚩🚩
              ✍🏻 - अक्षय पाटील

हे गणेशा, विघ्नहर्ता, गौरीपुत्रा!

 हे गणेशा, विघ्नहर्ता, गौरीपुत्रा!
         दोन दिवसांपूर्वी तुझं आमच्या घरात आगमन झालं. तुला आम्ही प्रथम पूजतो, कारण तू साऱ्यांचा विघ्नहर्ता आहेस. जग तुझी ओळख करते विघ्नं हरवणारा म्हणून, पण आज मराठ्यांच्या मार्गातलं हे सर्वात मोठं विघ्न , अन्यायाचं, दगडासारख्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाचं , अजूनही तसंच आहे!
          आज मराठा समाज मुंबईच्या दारात उभा आहे. संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो जीव आपल्या हक्कासाठी झगडत आहेत.न्यायासाठी पेटलेला हा महासागर, ही केवळ जमलेली माणसं नाहीत हे मराठ्यांच्या पराक्रमाची जिद्द, कित्येक वर्षाचा संयम याची साक्ष आहे! कितीतरी मोर्चे निघाले, कितीतरी अश्रू गळाले, आणि कितीतरी लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. घराघरात शोक आहे, आईंच्या कुशीतून लेकरं निघून गेली… तरीही सत्ताधाऱ्यांच्या मनात हलकाही बदल नाही!
        मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची लढाई न्यायासाठी आहे, अन्यायाच्या विरोधात आहे! कितीतरी आई बहिणी रडल्या, कित्येक घरं उध्वस्त झाली, तरुण लेकरांनी आरक्षणासाठी प्राण दिले. अजून किती किंमत मोजायची मराठ्यांनी ?
      हे गणेशा,आम्ही तुझ्यासमोर साकडं घालतो. तू जगाचा विघ्नहर्ता आहेस, आज मराठ्यांच्या वाटेत आलेलं विघ्न दूर कर! झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना बुध्दी दे, त्यांच्या मेंदूत न्यायाचा प्रकाश टाक, कारण हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
       हे विघ्नहर्त्या, मराठ्यांच्या वाट्याला आलेलं हे सर्वात मोठं विघ्न दूर कर. न्यायाचा दिवा पेटू दे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळू दे, जेणेकरून कोणत्याही आईच्या कुशीतून पुन्हा अश्रू गळू नयेत, कोणत्याही बापाच्या खांद्यावरून पुन्हा त्याच्या लेकराची प्रेत यात्रा निघू नये!
           हे गणेशा, आमचं साकडं एकच , मराठ्यांचा विजय निश्चित कर! अन्याय संपव, न्याय दे, आणि मराठा समाजाच्या अश्रूंना हास्याचं रूप दे!आमचं स्वाभिमानाचं सूर्य पुन्हा उगवू दे!
       हे गणेशा, तुझ्या आशीर्वादाशिवाय ही लढाई अपुरी राहील पण तुझ्या कृपेनं विजय निश्चित आहे!

© अक्षय पाटील , सोनवडे ता:शाहूवाडी, जि: कोल्हापूर 
ब्लॉग: akshaypatil1800.blogspot.com

ग्रामपंचायत निवडणूक

 गावागावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. आपल्या गावात यंदा सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे स्पष्टपणे जाणवतं की आता स्पर्धा जास्त तीव्र होणार आहे. परंतु या स्पर्धेचं स्वरूप काय असावं, यावर थोडं चिंतन करणं आज गरजेचं आहे.
        आज अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न बनून बसलेला आहे. "माझा माणूस सरपंच झाला पाहिजे", "आपलं वर्चस्व टिकलं पाहिजे", "दोन दिवस गावभर बॅनर लावून नाव चमकवलं पाहिजे" एवढ्यावरच मर्यादित राजकीय आकांक्षा आहेत. हे पाहता, सरपंच पदाचा वापर विकासासाठी झाला पाहिजे की केवळ आत्मप्रौढीसाठी, हा प्रश्न अधिकच टोकदार होतो.अनेकदा गावात रस्ते असोत, पाणीपुरवठा असो, गटारी असोत किंवा गावकुस सुधारणा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी निवडणूक म्हणजे फक्त मांडव, पोस्टर, जेवणावळी, आणि जातीय समीकरणं याच्यातच सारी शक्ती खर्च होते.
        ज्यांना आपण ‘माझी माणसं’ म्हणून निवडून देतो, त्यांपैकी कितीजणांना खरंच ग्रामपंचायत कायद्याचं, निधी वितरणाचं किंवा ग्रामसभेचं स्वरूप माहिती असतं?
एका संशोधनानुसार, सुमारे ८० टक्के सरपंचांना ग्रामपंचायतीची मूलभूत माहितीही नसते. मग असे लोक गावाचा विकास नेमका कसा करणार?
सरपंच पदावर बसणं म्हणजे 'मी किती मोठा आहे' हे दाखवण्याची जागा नाही, तर 'गावात काय मोठं करायचं आहे' याचा विचार करण्याची जागा आहे.
ही संधी आहे:
१.नव्या पिढीला योग्य सुविधा मिळवून देण्याची.
२.पारदर्शक कारभार रुजवण्याची.
३.शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोचवण्याची.
४.गावात समाजिक सलोखा प्रस्थापित करण्याची.
       यासाठी ज्यांना आपण उमेदवारी देतो, त्यांनी केवळ ‘सर्वसामान्य महिला’ म्हणून नव्हे, तर सुशिक्षित, समजूतदार, स्वप्न बाळगणाऱ्या महिला म्हणून समोर यावं, हीच खरी अपेक्षा.
         गावचा कारभार हा नात्यांवर, जातीतल्या मतांवर किंवा दबावांवर चालणार असेल, तर गाव तिथंच थांबेल. पण जर सरपंच पद ही एक सामाजिक बांधिलकी समजून घेतली, तर तोच गाव उन्नतीकडे झेप घेईल."एक सरपंच गाव बदलू शकतो, पण केवळ तेव्हाच जेव्हा त्याचं ध्येय स्वतःचा झेंडा फडकवण्याचं नसून गावासाठी दिवा लावण्याचं असेल."
          आज गावातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराने विचार करायला हवा की, आपण कोणाला आणि का निवडून देतो? निवडणूक म्हणजे आपलं भवितव्य ठरवणारा क्षण असतो, केवळ शेजारी किंवा नातेवाईक म्हणून कोणाला पुढे करणार असू, तर आपला विकास आपल्याच हातांनी गहाण ठेवत आहोत.एक जागृत गावकरी म्हणून विचार करायला हवा की *सरपंच पदासाठी लढणं प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर गावाच्या प्रगतीसाठी असावं.*

उद्घाटन

       

आजकाल कुठलाही उद्घाटनाचा कार्यक्रम असो, मग तो गावातल्या शाळेच्या वर्गाचा असो, पाण्याच्या टाकीचा, किंवा एखाद्या छोट्याशा वस्तीवरील रस्त्याचा एक गोष्ट हमखास दिसते.रिबीन कापायला नेता हवाच! ज्यांच्या हातात खुर्च्या आहेत, ज्यांचं नाव फलकावर छापता येतं, त्यांनाच मान दिला जातो. पण ज्यांच्या हातात खरंच घाम लागला, ज्यांनी स्वप्न पाहिलं, प्रयत्न केले ,म्हणजेच आई-वडील, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते त्यांचं योगदान कुठेतरी झाकोळलं जातं.

          कधी कधी वाटतं, रिबीन कापणं हेच काय आपण सन्मानाचं मोजमाप मानतो का? खरं तर उद्घाटनाची रीत अशी असावी की, ज्यांनी खरं काम केलंय, ज्यांनी स्वप्न बघितलं, त्यांनाच तो सन्मान मिळावा.

   राजकारणाच्या चमकदार फ्लॅशलाईटमध्ये, आईबापांसारख्या सावलीत उभ्या राहणाऱ्या लोकांचं स्थान पुन्हा मिळायला हवं.

© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 9 जुलै 2025

Father’s Day: आज त्याच्या मूक प्रेमाला आवाज देऊया…

 



आईवर भरभरून लिहिलं गेलं...
तिच्या सहवासाला, 
मायेच्या ओलाव्याला, 
तिच्या आठवणींना,
कवितांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये अगणित वेळा साजरं केलं गेलं. ती हसली, रडली, झिजली... आणि आपल्याला तिचा प्रत्येक कण उमगला.आई हे नातं नेहमी हृदयात साठवून ठेवलेलं, नेहमी बोलून दाखवलेलं... आणि ते दाखवावंसं वाटणारंही.पण याच घरातल्या एका कोपऱ्यात…कधी कपाळावर आठ्या घेऊन, कधी खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन, शांतपणे आयुष्यभर झिजणारा एक माणूस असतो , बाप!
आई दिसते, कारण ती उघड प्रेम करते.पण बाप?
तो कधी आपल्या थकलेल्या चेहऱ्यावरून ओळखला जातो, तर कधी आपल्या शांततेतून.. रागातून....
त्याने दिलेलं प्रेम फारसं कुणाला उमगतच नाही, कारण ते "मूक" असतं...कारण त्याने कधी मिठी मारून दाखवलेली नसते.
कधी सकाळी लवकर उठून डब्यात आपला आवडता पराठा टाकून देणारं आईच प्रेम लक्षात राहत पण आपल्याला वेळेत ऑफिस किंवा कॉलेजला सोडण्यासाठी झोप मोडून दारात उभा राहणारा बाप फारसा लक्षात राहत नाही...
पण म्हणून त्याचं प्रेम नसतं का?
बाप कधीच "प्रेम करतो" असं सांगत नाही...पण तो सतत करतच असतो.त्याच्या डोळ्यातले भाव आपण सहसा ओळखत नाही.कारण त्याला रडायला परवानगीच नसते…तो घराचा कणा असतो आणि कणा कधी वाकत नाहीत, असं आपण हुशार माणसं समजून बसलेलो असतो.बापाचं प्रेम व्यक्त नाही होत, पण प्रत्येक कृतीत स्पष्ट होत असतं.तो कधीही "तुला हवं ते घे" म्हणत नाही… पण जे हवं ते मुलांच्या हाती यावं यासाठी स्वतःच्या गरजा मागे ठेवतो.
कधी चुकलास तर तो रागावतो, ओरडतो...पण त्याच्या रागातही चिंता असते.कारण त्याला तुझं भविष्य जपायचं असतं.
तो थोडा कडक असतो…कारण त्याला माहित असतं की हसण्यापलीकडे एक जग आहे जे आपल्याला सहन करावं लागणार आहे.
आई शिकवते 'कसं जगावं', तर बाप शिकवतो 'जगायला लायक' कसं व्हावं.
आज जागतिक पितृदिन, Father's Day!
चला यानिमित्ताने, एकदा त्याच्या खांद्यावर हात टाकूया, त्याला मिठीत घेऊन 'I’m proud of you, बाबा' असं म्हणुया — त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटेपर्यंत...कारण तोही वाट पाहतोय ,पडद्याआडून, कुणीतरी त्याला समजून घ्यावं म्हणून.
ज्याच्या खांद्यावर बसून आपण जग पाहिलं,आज त्याच खांद्यावर प्रेमाने थोडं आपलं जग उतरूया.

© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 15 जून  2025

तो दिवस...ज्या दिवशी रायगडावर सिंहासन नाही, स्वराज्य उभं राहिलं!"


आज ६ जून...
हा कोणताही साधा दिवस नाही,
हा दिनांक फक्त दिनदर्शिकेतील एक पान नाही...
हा आहे तो दिवस,
ज्या दिवशी मातीने सिंह घडवला —
आणि त्या सिंहाने त्या मातीतच स्वराज्याचं बीज पेरलं!
आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन —
फक्त सिंहासनावर बसलेला एक राजा नव्हे,
तर जनतेच्या हक्काचं सामर्थ्य बनलेला ‘स्वराज्याचा शिल्पकार’.
त्या दिवशी रायगड फक्त किल्ला नव्हता... तो अख्खं मराठ्याचं स्वप्न होता!
गर्जना होत होत्या वेद मंत्रांच्या,
ढोल-नगाऱ्यांचा नाद आसमंतात दुमदुमला होता.
पण... त्याहीपेक्षा प्रचंड आवाज होता,
जनतेच्या डोळ्यातून झरणाऱ्या अभिमानाच्या अश्रूंनी साकार झालेल्या त्या "राजा"चा!
"शिवाजी राजा झाला....
जिजाऊंच्या पोटी जन्मलेला तो शिवबा...
हजारो रात्र जागून एक आईने संस्कारांचं लेकरू घडवलं,
आणि एक दिवस त्या लेकरानं
मुघलांच्या महालांना हादरवून ‘स्वराज्य’ प्रस्थापित केलं!
शिवबा सिंहासनावर बसला, पण त्याच्या डोळ्यात अंहकार नव्हता...
त्याच्या मनात फक्त एक विचार होता – माझ्या माणसांसाठी, माझ्या मातीतून, माझ्या धर्मासाठी न्यायाचं राज्य उभं करणं.
हा राज्याभिषेक नव्हता, हा शपथविधी होता.
शपथ होती –
"मी राजा आहे, पण माझं राज्य हे प्रजेचं आहे...
मी सिंहासनावर बसलो असलो, तरी स्वराज्याचा पहिला सेवक आहे!"
असं बोलणारा राजा? नाही, तो केवळ राजा नव्हता…
तो होता जनतेच्या हक्कांसाठी तलवार उपसणारा संतराजा!
सत्तेच्या शिखरावर जाऊनही अभिमानाचा अणुकणही न दाखवणारा,
पण मावळ्याच्या घामाला राजसन्मान देणारा!
कोणत्या बादशहाने दिला असा त्याग?
कोणत्या सुलतानाच्या रक्तात होतं असं आत्मभान?
हा विचार फक्त आणि फक्त —
छत्रपती शिवाजी महाराजांचाच!

एका झाडाचा आक्रोश

           

स्थळ: गावाच्या माळावर उभं असलेलं एक जुने, विशाल झाड. आज त्याला तोडण्यासाठी माणसं आलेली आहेत. कापण्याआधी, झाड एक शेवटचा आक्रोश करतं... विनवण्या करत....आजुबाजूला जैवविधता गोंधळलेली , सैरभैर आणि घाबरलेली असते... 
 
झाड: थांब रे माणसा!
कुठे चाललास तू? 
कसली घाई आहे एवढी? 
आणि हे हातात काय आहे ? कुऱ्हाड!🪚 ( कुऱ्हाडीचा लाकडी दांड्याने शरमेनं मान टाकलेली असते) 
माझ्या फांद्यांवर बसलेली ही वाऱ्याची झुळूक…
आज घाबरून गेली आहे ,भीतीने गप्प झालीय, 
बहुतेक मला पडताना बघायची तिच्यात हिम्मत राहिलेली नाही...
ही बघ ! ही माझी पाखरं 🕊️ आहेत… 
त्यांच्या पिल्लांची चिवचिव ऐकतोयस का? 
येतेय का ऐकायला तुला ? 
की तू पण व्यवस्थेसारखा बहिरा झाला आहेस ? 
त्यांना माहित नाही की आज त्यांचं घर 🪺 उद्ध्वस्त होणार आहे… 
त्यांच्या डोळ्यांत भीती आहे… 
आणि तू… 
तू कुठल्या विकासाची भाषा करतोस?
मी जेव्हा रुजलो होतो, 
तेव्हा या जमिनीला नवा श्वास मिळाला होता .
मी वाढलो, मोठा झालो, 
हजारो जीवांचं आधारस्थान झालो…
आज तू मला तोडतोस? 
कोणासाठी? 
विकासासाठी? 
तो विकास काय उपयोगाचा, 
जेव्हा अंगणं उजाड होतील, 
आणि मनं काळोखीने भरून जातील?
तुला मला तोडायच आहे ना ? 
मग तोड तर .… 
पण एकदा माझ्यात डोकावून बघ… 
माझ्या आड लपलेले पाखरांची घर, 
त्यांची निरागस पिलं, 
माझ्या फळा पानावर जगलेले पशू पक्षी. 
कित्येकांच्या संसाराचा आधारवड आहे मी..
हे सगळं माझ्यात सामावलेलं आहे. 
मी केवळ लाकूड नाही… 
मी एक सजीव आहे, श्वास घेणारा..तुझ्यासारखाच !  
तुला जगवणारा, तुला प्राणवायू देणारा ! 
आज तू मला तोडशील… 
उद्या तू पाण्यासाठी रडशील…
माझं सावली गेली की उन्हाने जळशील…
पावसासाठी डोंगर🗻 गाठशील, 
पण तिथे ढग 🌧️ नसतील….
कारण त्यांना रोखून धरणारा मी तिथे नसेल.
माझं एकदा दुःख जाणून बघं… 
एकदा डोळ्यांत बघं माझ्या…एकदा त्या निष्पाप पशु पक्षाचा आक्रोश
बघ, मी अजून गप्प आहे, कारण मी झाड आहे…आता माझे पशु पक्षी निसर्गरुपी न्यायालयात जातील. तक्रार करतील... न्यायनिवाडा करतील...तेव्हा माझ्या मरणाने निसर्गरूपी न्यायालय बोलू लागेल…आणि तो जेव्हा शिक्षा सुनावेल....तेव्हा...त्याने सुनावलेली शिक्षा तुझ्या गर्जनेपेक्षा, तुझ्या अस्त्रशस्त्रपेक्षा,कैक पटीने भयंकर आणि मोठा विध्वंसक असेल. मग मी पण बघतोच आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली तुला कोण कोण वाचवायला येतोय... 
 

दरवळत्या आंब्यांतून गाव आलं भेटायला

     
           
                गावाकडच्या घराच्या दारात उभं असलेलं आमचं आंब्याचं झाड… उन्हाळ्याचं आगमन झालं की ते आपोआप बहरायचं – जणू वर्षभर साठवलेलं प्रेम त्या फळांतून व्यक्त करायचं. त्या झाडाला ऋतूंची गणितं कधी समजवावी लागत नव्हती – त्याचं वेळेवर उमलणं आणि भरभरून फळणं.प्रत्येक मे-जून महिन्यात ते झाड भरभरून आंबे देतं – न थकता, न मागता. जणू आईचं प्रेमच  ते – सतत, शाश्वत आणि निस्सीम आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे यावर्षीही आईनं गावाहून पाठवलेली ती आंबे भरून पाठवलेली गोणी
            मात्र, यावर्षी आंब्यांचा प्रवास थोडा वेगळा होता. माझ्या गावातून – आईच्या हातून निघून – सासुरवाडीत..... तिथून मेहुणीकडे... आणि अखेर डोंबिवलीच्या गार्डा सर्कलला माझ्या हातात. सकाळी सुरू झालेला हा प्रवास रात्री १२ वाजता संपला – एकदम धावत्या लोकलसारखा.
         रूममध्ये आल्यावर आंब्यांचा तो पहिला वासच पुरेसा होता – गावाची आठवण जागवायला. आईनं प्रेमाने निवडून दिलेले ते मोजके आंबे...त्यात ममतेचा सुगंध होता.
यानंतरचा पुढचा प्रश्न होता – "आंबे पिकायचे कसे?"
ही मुंबई! इथे गवत कुठं मिळणार? आणि पिंजर कोणाजवळ असणार? गावात ही कामं अगदी सहज पार पडायची.तेव्हाच आमच्या बायकोनं थोडं डोकं लावलं – आणि तांदळात आंबे ठेवले पिकवायला.गावात जसं पिंजर, तसंच इथे – आमचं ‘तांदळाचं पिंजर’.गावाची पद्धत, मुंबईच्या घरात अवतरली होती… एका साध्या कल्पनेतून! पिकवायला ठेवल्यावर रोजचं तेच,कधी पिकतील?  कधी तो वास दरवळेल?  कधी पहिला घास तोंडात जाईल? दररोज आंब्यांकडे नजर जायची, पिकलेत का? अजून किती वाट पाहायची? या विचारांनी मन ओतप्रोत भरून जायचे.आणि मग तो दिवस येतो .आंबे खरंच पिकले होते. हातात घेतले, हळुवार सोलले... आणि त्या पहिल्याच घासात गावाचा गंध त्या एका चवेत मिसळलेला वाटला. माझी लहानपणापासूनची सवय — आंबे पोटभर खाण्याची आणि आजही, त्याच समृद्धीचा अनुभव घेतला
     मुंबईत राहत असलो, तरी आंब्यांची ही पेटी आली की वाटतं – गावानं स्वतःहून दार ठोठावलंय. गावचं दारात आलंय, गंधानं ओळखून, प्रेमानं जवळ बसायला, गप्पागोष्टी करायला.आईच्या हातून निघून आलेली ती गोणी भरून आंबे... त्यात आंब्यांची चव होतीच, पण त्याहून जास्त होती आईच्या मायेची चव !


© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि. 04 जून 2025


वेळेआधीचा पाऊस... आणि थांबलेली शेतकऱ्याची आशा?

   

                शाहूवाडी तालुका — निसर्गाच्या कुशीत विसावलेला, हिरव्यागार डोंगररांगांनी सजलेला, आणि वर्षानुवर्षे भातशेतीला ओलावा देणारा. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत येथे पावसाचं प्रमाण अधिक. त्यामुळे इथली मातीही खास – भातासाठी साजेशी, काळी आणि सुपीक.पावसाचे पहिले थेंब जिथे हळुवारपणे जमिनीवर पडतात, तिथे नुसतं पाणीच नव्हे, तर आशाही अंकुरते. पण यंदा पाऊस काहीसं वेगळंच गीत घेऊन आला आहे – सूरही वेगळा आणि तालही वेगळा.
               मे महिन्यातच ऐन पेरणीच्या वेळी पावसाने बळकट हजेरी लावली. जणू आभाळातून संयम सुटल्यासारखं वाटावं आणि काळजीचं धुकं शेतकऱ्याच्या मनावर उतरावं. या आधी जूनमध्ये येणाऱ्या पावसाच्या स्वागतासाठी शेतकरी सज्ज असायचा, पण यावेळी पावसाने वेळेआधीच "नमस्कार" केला आणि शेतकऱ्याच्या मनात प्रश्नांची वावटळ सुरू झाली.
"तयारी अपुरी, माती ओली, आणि मनात धाकधूक....."
भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी मे महिन्यातच सुरु व्हायची.यंदा मात्र पाऊस आधीच आला आणि पेरणीस सुरुवात करता आली नाही.अनेकांच्या मेहनतीची घडी विस्कटली, तर काहींनी तयारीच्या सुरुवातीलाच थांबावं लागलं.
           आता प्रश्न उभा राहतो – असाच पाऊस अजून काही दिवस सुरु झाला तर? कदाचित पेरणीचा टप्पा वगळून थेट रोपलावणीच करावी लागेल. या सगळ्यात मोठा प्रश्न शासन कितपत सोबत असेल.आजवर अनेकदा अनुभव आलाय – नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी उभा राहतो आपल्या हिमतीवर, पण मदतीच्या नावाखाली फक्त फॉर्म भरून, आश्वासनं ऐकून थांबावं लागतं.कर्जमाफीचं सरळ गणित उद्योगपतींसाठी लागू होतं, पण शेतकऱ्यांसाठी मात्र ते अजूनही गुंतागुंतीचं समीकरण आहे.शेतकऱ्याचं आयुष्य हेच – काळजावर दगड ठेवून मातीशी नातं टिकवनं.
         शाहूवाडीचा शेतकरी आजही आपल्या मातीशी नातं सोडत नाही – कारण त्याला माहीत आहे, की संकटं येतात आणि जातात...पण आता केवळ निसर्गाशी नव्हे, तर शासनाशीही एक प्रामाणिक अपेक्षा आहे – "आम्हाला फक्त मदतीच्या जाहिराती नकोत, कृती हवीय.कारण भाताच्या रोपात केवळ धान्य नसतं, तर लाखो शेतकऱ्याची स्वप्नं रुजलेली असतात."
यावेळी पाऊस वेळेआधी आला, पण...
शासनाची मदत वेळेवर येईल का?
आज हवामान निसर्गानं बदललंय, पण आता शासनानेही धोरणं बदलून मदतीचा हात अधिक सढळपणे पुढे करायला हवा.

© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि.29 मे 2025



शहरातली जांभळं...., गावाची आठवण


                        आज सकाळी ऑफिसहून घरी जाताना, ठाणे (पश्चिम) रेल्वे स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला जांभळं विकणारी काही माणसं दिसली. तिथे जाऊन जमेल तसं भाव करत ५० रुपयांची जांभळं घेतली. घरी आल्यावर ती धुत असताना डोळ्यांसमोर एक वेगळीच दुनिया उभी राहिली – बालपणाची, गावाकडची, आणि त्या रानमेव्याची! रानमेवा हा लहानपणापासून माझ्या मनाच्या फार जवळचा विषय. त्याचं आकर्षण इतकं की, एखादं जाभळं,करवंदं बघितलं की आतून एक हुरहूर दाटून येते.अगदी लहानपणीची आठवण करून देते.

          आमच्या घराच्या बाजूलाच एक भलंमोठं जांभळाचं झाड होतं. एखाद्या सन्माननीय वृद्धासारखं ते झाड आमच्या बालपणीचं साक्षीदार होतं.मे महिना उजाडला की झाडावर काळसर-जांभळ्या रंगाचं सौंदर्य खुलायला लागायचं. वाऱ्याच्या झुळकीनं रात्रभर झाडाखालचं अंगण जांभळांनी सजलेलं असायचं. सकाळी उठल्यावर चहापेक्षा आधी आमचं लक्ष असायचं त्या झाडाकडे "आज किती जांभळं पडली असतील?" हा प्रश्नच आमच्या सकाळी उत्सुकतेचा भाग व्हायचा. आम्ही भावंडं, मिळून स्पर्धा लावायचो . कुणाला किती गोड आणि किती मोठी जांभळं मिळतात. एकेका जांभळासाठी किती धावाधाव, कधी हसणं, कधी किरकिर, तर कधी कधी एकमेकांच्या पिशवीमधून चोरून जांभळं काढण्याची गंमत!

              लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत निकाल लागला की माझं मामाच्या गावाला – पिशवीला – जाणं फिक्स असायचं. पिशवीला लागूनच डोंगर, समृद्ध वृक्ष संपदा होती, आणि त्यामुळे करवंदं आणि जांभळांची रेलचेल असायची.भावंडांच्या सहवासात त्या रानमेव्याचा स्वाद वेगळाच लागायचा. झाडावर चढून करवंदं तोडायची, किंवा रानात भटकत भटकत गोडसर जांभळं सापडली की त्यावर तुटून पडायचो. खऱ्या अर्थानं मे महिन्याच्या सुट्ट्या त्या चवीनीच गोड व्हायच्या.
              तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की एक दिवस ते जांभळाचं झाडच राहणार नाही.वर्षानुवर्षं गेली… त्या झाडाखाली खेळणारी पिढी मोठी झाली....आणि त्या आठवणींना एक हळवी किनार लागली.
               मुंबईसारख्या शहरात जांभळं विकत घेऊन खावी लागतात – पण त्यात गावासारखा गोडवा कधीच सापडत नाही. कारण त्या जांभळांमध्ये आमच्या बालपणीच्या खेळाचा, श्रमाचा, आणि आनंदाचा स्वाद मिसळलेला असायचा.आज जांभळं बघून मन भरून आलं.गाव सोडलं... झाड गेलं... पण त्या झाडाखालील लहान मुले अजूनही मनात कुठेतरी धावत असतात. जांभळं वेचण्यासाठी... आणि आठवणींना जपण्यासाठी....

© अक्षय पाटील, सोनवडे | दि.२३ मे २०२५

ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग

ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग


       पहेलगाव... जिथे सकाळचं सूर्योदय न दिसता, काळोखाचं भेसूर रूप पहाटेच दाटून आलं. जिथे मायेच्या कुशीत असणाऱ्या लेकरांच्या गालांवर हास्य नव्हतं, तर भीतीचा थरकाप होता. जिथे एकाच क्षणात घरांतील स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्रं ओझं बनली.अखंड भारतवासियांना त्या दिवशी दुःखाच्या सावलीत उभं राहावं लागलं.

      तो हल्ला केवळ बंदुकांचा नव्हता तर तो हल्ला होता संपूर्ण भारतमातेच्या सत्त्वावर !पण भारत झुकत नाही... भारत क्षमा करतो, पण विसरत नाही! त्या अश्रूंनी जेव्हा राष्ट्राच्या काळजाला चिरलं, तेव्हा भारताने आपल्या संयमाच्या सीमांना मागे टाकत प्रतिशोधाचा रणसंग्राम छेडला — ऑपरेशन सिंदूर!

          ही  केवळ लष्करी कारवाई नव्हती, हा शपथविधी होता.ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ शत्रूला प्रत्युत्तर नव्हे, तर त्या प्रत्येक सतीच्या शापाला उत्तर होतं. त्या फुटलेल्या मंगळसूत्रांचं, भिरभिरणाऱ्या नजरेच्या लेकरांचं, आणि मातृत्वाच्या चिरडलेल्या हुंदक्यांचं प्रतिघोष होता – हा प्रतिशोध नव्हे, हा न्याय होता!

"तुम्ही आमचं कुंकू पुसलं, आम्ही तुमचा गर्व उद्ध्वस्त केला!" या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांच्या छातीत भयाचं वादळ उठवलं, तर देशवासीयांच्या रक्तात पुन्हा आत्मसन्मान, अभिमान उसळून आला.

            आज आपली जबाबदारी आहे – जागृत राहणं, एकदिलाने उभं राहणं, आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करणं.कारण जे सैनिक सीमेवर झगडतात, त्यांच्या पाठिशी उभं राहणं, हेच खरं देशप्रेम. "कुंकवासाठी चाललेलं हे युद्ध, प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतमातेचं कुंकू जपण्यासाठीचं आहे."

शब्द संपतील, पण शौर्याचं स्मरण कधीच संपणार नाही.

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १० मे २०२५

अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी

 🌿 अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी 🌿

      कधी कधी आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतं… एक क्षण असतो, आणि सगळं उलथून जातं.

             परवा एक बातमी अशी आली की काळजावर खोल जखम करत गेली — आमची मोठी मावशी, घरातली, नात्यातली एक ऊबदार सावली,अचानकच आमच्यातून निघून गेली.ती गेली… आणि आयुष्य थोडंसं स्तब्ध झालं.जणू काळाने थोडावेळ थांबावं, असं काहीसं क्षणभर वाटून गेलं. ती नेहमीसारखीच होती — हसरी, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी. आणि एक दिवस अचानक… ती नाहीशी झाली. शब्दांत न मावणारी पोकळी निर्माण करून आयुष्याच्या धावपळीतला एक Permanent आधार अचानक निखळला.

         मावशी केवळ नात्याने मावशी नव्हती, ती आमच्यासाठी दुसरी आई होती.लहानपणापासून तिचं प्रेम, तिचं हसणं, प्रत्येक सणात तिचा गोड आवाज — सगळं सगळं आठवतंय.आणि आता या आठवणींच्या गर्दीत एक सल मनात घर करून बसली आहे..

              मावशीचं एक ऑपरेशन होणार होतं. ते झाल्यावर मी तिला भेटायला गावी जायचं ठरवलं होतं — दोन दिवसासाठी तरी.माझ्याही मनात काही शंका नव्हती, वाटलं,साधं ऑपरेशनच तर आहे, होऊन जाईल नीट.शनिवारची सुट्टी होती, पण कुठंतरी कंटाळा आला, विचार केला ऑपरेशन झालं की पुढच्या शनिवार, रविवार गावी जाऊन मावशीला भेटायचं. आज त्या क्षणाची आठवण येते तेव्हा काळजावर ओझं येतं .गेलो असतो, तर शेवटचं पाहता आलं असतं… एखादा शब्द, एखादं हास्य, एक साश्रु मिठी… ती क्षणभराची भेट आयुष्यभर पुरली असती. पण तो क्षण निसटून गेला, कायमचा.भेटीपासून मी स्वतःलाच वंचित ठेवलं. ही सल — ही जन्मभर लक्षात राहणारी, बोचणारी गोष्ट बनून गेली आहे. माफ कर, मावशी मला शेवटच्या क्षणी तुझ्या सोबत न राहता येणं ही माझी चूक होती… पण मनापासून सांगतो, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.

            आयुष्यात आपण किती गोष्टी "नंतर बघू", "उद्या करू" म्हणत टाळतो. पण मृत्यू कुठलाही अलार्म लावून येत नाही… तो येतो अचानक आणि आपण उभे राहतो पोकळपणे त्या क्षणासमोर.माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी उरतात, आणि त्या आठवणींच्या मागे आपण कित्येक "काय झालं असतं जर..." असे प्रश्न घेऊन जगत राहतो.

        मावशीची उणीव शब्दांत मावळणारी नाही. ती नसणं आज घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतं. पण तिचं प्रेम, तिच्या आवाजातली माया, तिचा काळजीचा सूर, तिचं विचारणं — “तू आणि सुषमा चांगलं आहेसा का रे?” हे सगळं आठवलं, की डोळ्यांच्या कडा ओलावतात. हे सगळं कायमच्या आठवणीत साठवून ठेवलंय. आम्ही सगळे अजूनही तिच्या आठवणींमध्ये हरवलेले आहोत. तिचं असणं आमच्यासाठी आशीर्वाद होतं, एक हक्काच सपोर्ट सिस्टीम होती आणि तिचं जाणं — जे कधीच भरून निघणार नाही.

                मावशी, तू गेलीस… पण तुझ्या आठवणींनी, तुझ्या मायाळू आवाजाने, प्रेमळ साध्या स्वभावाने आणि प्रत्येक वेळेस पाठीशी उभं राहण्याच्या तुझ्या सवयीने एक अमिट ठसा सोडून गेलीस. आमच्या गावच्या यात्रेत तुझं शेवटचं हास्य, शेवटचं बोलणं… आता फक्त आठवणींच्या धाग्यांत गुंफावं लागणार.कधी भेट होईल का पुन्हा, माहित नाही… पण एक मात्र नक्की — तुझी आठवण रोज मनाच्या पानांवर अलगद उतरते… आणि डोळ्यांच्या कडांवर थांबून राहते.

💐 श्रद्धांजली मावशी… तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद, कायम आमच्या सोबत राहील…

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. ७ मे २०२५

१ मे — महाराष्ट्र दिन



ही केवळ एक दिनांक नाही,

ही आहे अस्मितेची आठवण, 

गर्वाची जाणीव, आणि आपल्या मराठी मातीतल्या माणसांच्या शौर्याची बलिदानाची साक्ष !

"दिल्लीचे ही तक्त राखी" – ही ओळ उच्चारली की काळजाच्या खोल तळातून एक आवाज येतो,

"हो! हा महाराष्ट्र माझा आहे!"

हा तोच महाराष्ट्र आहे...ज्याने आदिलशाही, मुघलशाही, इंग्रजशाही झुगारून 'स्वराज्य' उभारलं.

ज्याने शत्रूंच्या सिंहासनाला हादरवलं, आणि न्यायाचं राज्य उभारलं.

जिथं तलवारीच्या टवटवीत धारेत इतिहास कोरला गेला,आणि गडकोटांवर स्वराज्याची पताका फडफडली.

जिथं बाळ गंगाधर टिळकांची असंतोषाची ठिणगी पेटली आणि लोकमान्य झाले.

जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, समता, आणि शिक्षणाचा मशाल पेटवला.

पण या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीही एक संघर्ष होता,एक आंदोलन होतं,आणि १०७ हुतात्म्यांचं रक्त सांडलं होतं!हो, आजचा हा महाराष्ट्र १०७ हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा आहे.ते लढले, कारण त्यांना हवी होती एक भाषा, एक संस्कृती, एक ओळख –

"मराठी माणसाचा महाराष्ट्र!"

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले हे वीरगोळ्यांच्या वर्षावातही मागे हटले नाहीत.त्यांच्या रक्तानं या मातीला पवित्र केलं…आणि म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो –

"हा महाराष्ट्र माझा आहे!" 

आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही,तर ते बलिदान आठवून, नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचा आहे.शपथ घेण्याचा दिवस आहे,की हा महाराष्ट्र आपण तसाच राखू, जसा छत्रपतींनी घडवला, आणि शहिदांनी जपला!

जय महाराष्ट्र!

शिवरायांचा अभिमान – महाराष्ट्र!

 © अक्षय पाटील, सोनवडे | दि. १ मे २०२५

श्रमाचा सन्मान हवाच!

आज कामगार दिन आहे. सरकारी कार्यालयांमध्ये, सार्वजनिक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे हक्क, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळते. त्यांची नोकरी शाश्वत असते, त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, पगारवाढ, सुट्ट्या – हे सर्व काही ठरलेले आणि खात्रीशीर असते. पण या सुरक्षित व्यवस्थेच्या बाहेर, एक मोठा वर्ग आहे – खाजगी व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा.

हे कामगार कोण आहेत?

हे आहेत बांधकाम मजूर, फॅक्टरीतील कंत्राटी कर्मचारी, रस्त्यावर काम करणारे सफाई कामगार, सुरक्षारक्षक, हॉटेल-रेस्टॉरंटमधील वेटर्स, टेक्स्टाइल मिल्समध्ये काम करणारे लोक, ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉयज, घरकाम करणाऱ्या महिला… या सर्वांना आपण ‘कामगार’ म्हणतो, पण त्यांच्या कष्टांचा मोबदला मात्र किती अपुरा असतो!

कामाच्या तासांचा विचार केला तर…

बरेच खाजगी कर्मचारी दिवसाचे १२-१३ तास काम करतात. आठवड्याला एकही सुट्टी मिळत नाही. ओव्हरटाइमचे पैसे दिले जात नाहीत. पगार वेळेवर मिळत नाही, आणि मिळालाच, तरी तो कायदेशीर किमान वेतनाच्या ही खाली असतो. आणि आजारी पडले किंवा कामावरून काढून टाकले, तर त्यांना कोणताही हक्क राहत नाही.

सोशल सेक्युरिटी कुठे आहे?

अनेक ठिकाणी आजही कामगारांना पीएफ, ईएसआय, बोनस, पगार स्लिपसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. काहींना तर आपली नोकरी कधी संपेल याचीही कल्पना नसते – कारण कोणताही कागदोपत्री करार होत नाही.

मानवतेला भिडणारी एक गोष्ट म्हणजे…

या कामगारांना "मशीन" समजून घेतले जाते. भावना, गरजा, घरातील जबाबदाऱ्या – यांचा विचार न करता त्यांच्याकडून "उत्पादन" घेतले जाते. त्यांच्या पाठीमागे ना युनियन असते, ना आधार. जेव्हा एखादा मजूर कामावरून काढला जातो, तेव्हा तो केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह संपतो.

म्हणूनच आजच्या दिवशी…

केवळ सेलिब्रेशन नव्हे, तर आत्मपरीक्षण हवे.खाजगी व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्थिरता, सुरक्षितता, आणि मानवतेने भरलेले व्यवहार आवश्यक आहेत.

कामगार हा केवळ एक 'हात' नव्हे, तो एक 'हृदय' आहे – भावना असलेली, स्वप्ने पाहणारी माणसे. त्यांच्यासाठी आपल्या धोरणात, व्यवस्थेत आणि समाजाच्या दृष्टिकोनात बदल हवा.

कारण श्रमाचा सन्मान झाला,तरच खऱ्या अर्थाने कामगार दिन साजरा झाला म्हणता येईल.

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १ मे २०२५

वनीकरणाची दिखाऊ धामधूम की खरी जबाबदारी?"



           पावसाळ्याचे आगमन होताच आपल्याला सर्वत्र दिसू लागतात ते म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा असे फलक, बॅनर आणि जाहिराती. एकूणच वातावरणात अचानक 'हरित क्रांती'चा उत्साह निर्माण होतो. सोशल मीडियावर फोटो अपलोड होतात – हातात फावडे, गच्चीवर हसू आणि नव्या लागवडीचे झाड. पण खरोखर यामागची भावना खरी आहे का?  

संपूर्ण वर्षभर झाडांकडे दुर्लक्ष करणारे, झाडांच्या सावलीखाली उभी गाडी लावणारे, झाडे तोडून सिमेंटचे जंगल उभारणारेच पावसाळ्यात पुढे सरसावतात. 'झाडे लावा' म्हणणारे काही अधिकारी तर झाडांचे खरे नावसुद्धा सांगू शकत नाहीत. अनेक वेळा या कार्यक्रमांचे आयोजन केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित राहते. लागवड होते, पण देखभाल नाही. पुढील काही आठवड्यांतच ती रोपे वाळून मरतात.

वनीकरण हे एकदिवसीय कार्यक्रम नसून सातत्याने, जबाबदारीने करण्याचा विषय आहे. झाड लावणे हे फक्त फोटोसाठी नव्हे, तर पर्यावरण रक्षणासाठी असले पाहिजे. एक झाड वाढवायचं असेल, तर त्याला प्रेम, काळजी आणि सततचा संपर्क हवा असतो – अगदी एखाद्या लेकरासारखं.

आपल्या गावात, शहरात, प्रत्येक नागरिकाने एक झाड लावण्याइतपतच नव्हे तर त्याच्या वाढीची जबाबदारी घेण्याची गरज आहे. झाड हे 'ड्युटी' नाही, ती आपली 'कर्तव्य भावना' असली पाहिजे.

यंदाच्या पावसाळ्यात एकच संकल्प करू –

"फोटोपुरती नाही, जबाबदारीने वनीकरण करू!"

© अक्षय पाटील, सोनवडे

महिला सरपंच आरक्षण – सक्षमीकरण की छुपी गुलामी ?


             ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची चाहूल लागलेली आहे. गावागावांमध्ये पुन्हा एकदा राजकारणाच्या चक्राला गती मिळतेय. यंदा काही गावांमध्ये सरपंचपदासाठी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हे ऐकून अनेकांच्या मनात आशेचा किरण जागतो – आता गावकऱ्यांच्या समस्या एका ‘मातृहृदयाने’ समजून घेतल्या जातील, आता निर्णय प्रक्रियेत ‘ती’ ही सहभागी होईल, गावाचे भविष्य ‘तिच्या’ हातून उजळेल! पण वास्तवाची कटू चव कडवटच असते.अनेक ठिकाणी महिला सरपंच निवडल्या जात असल्या, तरी त्या केवळ 'नावापुरत्या' असतात. शिक्का तिचा, निर्णय कोणाचा? नवऱ्याचा, भावाचा, पक्षाच्या एखाद्या ‘नेत्याचा’. ही ‘सरपंच बाई’ गावाच्या सभागृहात दिसते खरी, पण तिच्या शेजारी दिसतो तो खरा ‘निर्णय घेणारा पुरुष’. बाईच्या नावावर गाव चालवलं जातं, पण तिच्या निर्णयांची किंमत शून्य.हे चित्र फार घातक आहे – कारण ते एका संधीचा अपमान आहे, एका बदलाची हत्या आहे. लोकशाहीची उघड उघड केलेली हत्या आहे.

आरक्षणाने खुर्ची मिळते, पण ताकद मिळते का?

            आज महिला सरपंच ‘डमी’ बनून राहिल्या आहेत. गावात जे पक्षीय खेळ सुरू असतात, त्यात त्या फक्त प्यादी बनतात. सत्ता मिळवण्यासाठी, विरोधकांना हरवण्यासाठी, योजनांच्या वाटपावर कब्जा ठेवण्यासाठी – बाईचा वापर केला जातो, आदर नाही. ती फक्त सही करणारी ठरते, ठाम बोलणारी नव्हे. तिच्या नजरेत गावाचा विकास असतो, पण हातात काहीही नसतं. सत्तेची ही खोटी संधी म्हणजे खऱ्या सशक्तीकरणाची विटंबना आहे.जेव्हा एक सामान्य ग्रामीण महिला सरपंच होते, तेव्हा गावकऱ्यांमध्ये अपेक्षा असते – की ती आपल्या सारख्यांची आहे, आपल्या घराची आहे, कष्टाची, माणुसकीची आहे. पण जेव्हा तिच्या नावावर दुसरे लोक सत्ता राबवतात, तेव्हा त्या अपेक्षांवर तुडवून जाण्याइतका मोठा विश्वासघात दुसरा नसतो, तिच्याशीही आणि लोकांशीही.

ही वेळ आहे – आरक्षणाला अर्थ द्यायची.

महिलांना ‘केवळ’ निवडून देण्यापेक्षा, त्यांना ‘खऱ्या अर्थाने निर्णयक्षम’ बनवायची.

"ती "च्या मताला मोल द्या,"ती "च्या स्वप्नांना पंख द्या."ती "च्या हाती खरोखरची सूत्रं द्या – कारण "ती" फक्त ‘सरपंच बाई’ नाही, "ती "गावाचं भविष्य आहे.

© अक्षय पाटील, सोनवडे

२०१२ ते २०२५: आठवणींच्या वाटेवरून पुन्हा एकदा शाळेत

 



                                  १२ वर्षांपूर्वी मागे टाकलेली ती श्री शंभू महादेव माध्य. हायस्कुल, साळशीची पायवाट…जिच्यावरून कधी चालत, कधी सायकलवर आणि खांद्यावरच्या दप्तराच्या ओझ्याखाली स्वप्नांची पताका घेऊन आम्ही रोज निघायचो..तीच पायवाट आज पुन्हा, आठवणींचं ओझं वाहत माझ्यापर्यंत आली होती कारण निमित्त होतं , माजी विद्यार्थी मेळाव्याचं....क्षणभर पाय थबकले... डोळे बंद झाले... आणि काळ मागे सरकत गेला. २०१२… दहावी झाली. शाळा संपली.मनात धडधडणारी स्वप्नं होती, पुढे उड्डाण घेण्याची घाई होती आणि मागे राहिलं होतं ते शाळेचं दार, जिथून आयुष्य सुरू झालं होतं.आमच्या सोनवडे गावात हायस्कूल नव्हतं म्हणून शेजारच्या साळशी या गावी जावं लागायचं..कधी अंगाला झोंबणाऱ्या थंडीचा शहारा सहन करत,तर कधी उष्ण उन्हात.त्या वाटेने फक्त प्रवास नव्हता होत,तर आयुष्य घडवण्याचा एक सुंदर अध्याय लिहिला जात होता.शाळेत पोहोचल्यावर पहिली घंटा,वर्गात शिक्षकांनी धडपडून शिकवणं, आणि मधल्या सुट्टीत वाडीवरच्या मित्रांसोबत जेवणाचा डब्बा खाणं...हे सगळं आता आठवणीत जपलेलं होतं. पण वेळेच्या ओघात… सगळे वेगवेगळ्या वाटांवर निघून गेलेले.कोणी लग्न करून नव्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलं, कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी वेग वेगळ्या शहरामध्ये स्थिरावलं.आयुष्याची चक्रं एवढी भराभर फिरली की, "कधी भेटूया?" हे फक्त व्हॉट्सॲपवरचे शब्दच उरले.आणि एक दिवस अचानक, माझ्या मोबाईलवर एक आवाज हळुवार दाद देऊन गेला.आमच्या त्यावेळेच्या वर्गशिक्षक असलेले कराळे सरांचा फोन आला. “माजी विद्यार्थी मेळावा आहे १९ जानेवारीला. सर्वजण येणार आहेत. तुम्ही सर्वजण मिळून या.” ते आमंत्रण नव्हतं…ते एक प्रेमळ हाक होती.क्षणभर असं वाटलं जणू कुणीतरी भूतकाळाचं दार उघडलंय.आपल्याला भूतकाळात बोलावत आहे, परत एकदा शाळेतले क्षण अनुभवायला....क्षणभर डोळे भरून आले.मी ठरवलं – या क्षणाला पुन्हा हुकवायचं नाही.सगळं काम बाजूला ठेवलं.आठवडाभर गावी मुक्काम ठरवला आणि त्या दिवशी १९ जानेवारीला, सकाळी दहा वाजता, पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात स्वप्नांच्या त्या जुन्या सावलीत,मी पोहोचलो.हा केवळ एक रविवार दिवस नव्हता,हया दिवसाने आमच्या मनाच्या खोल कप्प्यात लपलेल्या शाळेच्या आठवणींना पुन्हा एकदा जागं केलं .जेव्हा आम्ही शाळेच्या अंगणात पाय ठेवला…तेव्हा वाटलं आमचं हरवलेलं बालपण परत एकदा आमच्याशी भेटायला आलं आहे. ती शाळेची इमारत,ती घंटा, ते ओळखीचे आवाज…सगळं काही क्षणभरासाठी थांबलेलं होतं,१२ वर्षांनंतर तेच अंगण, तोच दरवाजा, तीच भिंत... पण या वेळेस हातात पुस्तकं नव्हती, होती तर आठवणींची एक रुखरुख.असं वाटायचं की शाळेच्या भिंतींमध्ये काही तरी जिवंत आहे,जसं तिथे अजूनही आपल्या हसण्याचा, धावण्याचा, ओरडण्याचा आवाज साठवून ठेवलेला आहे.शाळेची सजावट देखणी होती –रंगरंगोटी केलेली इमारत, भव्य मंडप, खुर्च्या, मंच, आणि माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करणारा तो उत्साही माहोल ..पण त्या सजावटीपेक्षा जास्त सुंदर होतं ते वातावरण. एकत्र येणाऱ्या जुन्या मित्रांचे हसणे, डोळ्यांतून ओघळणाऱ्या आठवणी, आणि नकळत डोळ्यांत भरून येणारं पाणी. स्नेह, आठवणी, आणि पुन्हा भेटीचा आनंद..२०१२ मध्ये बंद झालेलं आयुष्याचं एक दार, २०२५ मध्ये पुन्हा एकदा उघडल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं थांबलेलं होतं...आणि त्या क्षणात काळ, वय, जबाबदाऱ्या सगळं हरवून गेलं होतं. फक्त उरलं होतं एक निखळ, निरागस भाव…"शाळा अजून तिथंच आहे... आणि आपलं बालपणही."

       शाळेच्या अंगणात समोर गुरुजी दिसले. थोडंसं वय वाढलेलं, पण चेहऱ्यावरचं तेज तसंच. जणू काळाने त्यांना स्पर्श केलाच नाही.आम्ही सर्वजण एकच उत्साहाने पुढे सरसावलो, आणि त्यांना नमस्कार केला.त्या क्षणी, क्षणभरासाठी का होईना, वेळ मागे फिरला होता… मी पुन्हा हायस्कूलमधला तोच मुलगा झालो होतो.वहीच्या कोऱ्या पानात शाबासकीच्या शिक्क्याची वाट बघणारा.गुरुजींच्या नजरेत अजूनही तीच ओळख होती, तीच आपुलकी…गुरुजींचा आशीर्वाद हा केवळ अभ्यासापुरता नव्हता त्यात माणूस घडवण्याची ताकद होती. आजच्या धावपळीत, यशाच्या शोधात हरवलेली ती नजर, तो स्पर्श, पुन्हा एकदा अंतर्मनाला जागं करून गेला. काही स्पर्श शब्दांपलीकडचे असतात, आणि काही माणसं काळाच्या बाहेर जगतात.

        कार्यक्रम सुरू झाला. मंचावर येऊन सूत्रसंचालन करत होते आमचे मराठीचे लाडके कांबळे सर. कधी गमतीदार विनोद करून हशा पिकवणारे, तर कधी अत्यंत गंभीरपणे विचार करायला लावणारे.त्यांची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती. आजही, त्यांच्या त्या खास शैलीत, त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला वर्गात आणून बसवलं.कांबळे सर ,मराठी आणि भूगोल शिकवायचे. पण खरं सांगायचं झालं, तर मराठी हा त्यांचा खरा श्वास होता.त्यांची भाषेवरील पकड, बोलण्यातली लय, आणि कविता सांगताना डोळ्यांतली चमक…हे सगळं पाहिलं की असं वाटायचं ,हे शिक्षक फक्त मराठी शिकवण्यासाठीच जन्माला आलेत. त्यांच्या शिकवणीत गोडवा होता आणि शुद्धतेची चुणूकही.       

            शिस्त म्हणजे खोराटेसर…खोराटेसर, जे आमच्या वेळचे मुख्याध्यापक होते… आणि आजही आहेत.त्यांनी शाळेच्या भविष्यासाठी दिलेलं मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी ठरलं.नेहमी कडक आणि शिस्तप्रिय असलेले खोराटे सर ,आज मात्र त्यांच्या आवाजात एक वेगळीच माया होती.खोराटेसर इंग्रजी शिकवायचे आणि इंग्रजी माझा पाचवीपासूनच आवडता विषय होता.पण या विषयावर प्रेम जडलं, ते त्यांच्या प्रभावी आणि शिस्तबद्ध शिकवणीमुळेच.सर विद्यार्थांना शिक्षा करायला कधीच मागे हटायचे नाहीत. शाळेतील शिस्त टिकवण्यासाठी त्यांची भूमिका कठोर पण अत्यावश्यक होती.ते फक्त इंग्रजी शिकवत नव्हते… ते व्यक्तिमत्त्व घडवत होते, नीतीमूल्यं रुजवत होते.त्यांच्या कडक शिस्तीमुळेच आमचं हायस्कूल पंचक्रोशीत शिस्तप्रिय हायस्कूल म्हणून ओळखलं जायचं.पण आज… त्यांच्या आवाजातली माया, डोळ्यांतली ओल, आणि विद्यार्थ्यांबद्दलचा अभिमान.हे सगळं अनुभवताना जाणवलं, की कधीकाळी ज्यांना आपण फक्त "कडक शिक्षक" समजत होतो,तेच शिक्षक आपल्या आयुष्यातील खरे शिल्पकार ठरले.खोराटेसरांनी जेव्हा सांगितलं की बिऊरकरसर, निंबाळकर सर आणि काही इतर शिक्षक लवकरच निवृत्त होणार आहेत,तेव्हा संपूर्ण मंडपात एक भावनिक लाट उसळली.त्या भावुक क्षणांमध्ये सरांनी आमच्या हायस्कूलचे संस्थापक श्री महादेव पाटील साहेब यांचा जीवनप्रवास उलगडला. शिक्षण हेच साधन मानून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा उजेड पोहोचवला.त्यांची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली नितांत प्रेमभावना यामुळेच आमचं हायस्कूल इतकं घडू शकलं. कार्यक्रमात शाळेच्या वतीने त्यांना सन्मानित करून गौरवण्यात आलं.तो क्षण म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मनातल्या कृतज्ञतेचा नतमस्तक नमस्कार होता.                       

            बिऊरकर सर आमचे विज्ञान, चित्रकला आणि पर्यावरण विषयांचे शिक्षक होते. शिकवताना ते हमखास एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा दाखला देत, त्यामुळे विषय समजायला सोपा आणि रोचक वाटायचा. त्यांच्या शिकवणीत प्रयोगशीलता होती, कल्पनाशक्ती होती.चित्रकलेतून सर्जनशीलता, विज्ञानातल्या प्रयोगांमधून जिज्ञासा, आणि पर्यावरण शिकवताना निसर्गाशी नातं जोडण्याची जाणीव हे सगळं त्यांच्या शिकवणीतून उमजायचं.                

          निंबाळकर सर आमचे इतिहास आणि कवायतचे शिक्षक. त्यांची शिस्त म्हणजे एक आदर्शच होता. वर्गात शिस्तीचा अंमल आणि मैदानावर कवायतीचा डौल यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या हातातली वादी एक प्रकारचा लांबट चाबूकच आणि त्याच्या शेवटी नेहमी बांधलेली शिट्टी अजूनही नजरेसमोर झळकते...माझं कवायतशी काही फारसं सख्य नव्हतं. सावधान आणि विश्राम या दोन आज्ञा सोडल्या, तर काहीच जमत नव्हतं. परिणामी दोन-तीन वेळा सकाळी पहाटे मैदानावर वादीचाही प्रसाद मिळाला! आणि त्यानंतर मी कवायतमधून गुपचूप माघार घेतली.त्यांच्या शिकवणीत एक वेगळीच ताकद होती. ती होती शिस्तीची, जबाबदारीची आणि आत्मविश्वासाची. इतिहासाचे धडे असोत किंवा कवायतीचे आदेश  त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीत शिस्त आणि निष्ठा शिकायला मिळाली.सरांचा रागही आमच्यासाठी शेवटी आशीर्वाद ठरला. कारण त्यांच्या कठोर मार्गदर्शनाखालीच अनेकांनी खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.                        

           कराळे सर आठवी ते दहावीपर्यंत आमचे वर्गशिक्षक आणि गणिताचे मार्गदर्शक होते. गणित हा विषय कित्येकांना कोरडा, रटाळ आणि अवघड वाटतो पण कराळे सरांनी तो आमच्यासाठी अगदी सोपा, मजेशीर आणि आवडता बनवला होता.ते शिकवत असताना कधी एखाद्या गणिती सूत्रामागची गंमत सांगायचे, तर कधी वर्गात एखादी विनोदी गोष्ट टाकून वातावरण हलकं करत. आणि गरज असेल तेव्हा गंभीर होऊन समजावूनही सांगायचे.कराळे सरांची ती गावाकडची बोली, बोलण्याची सहज आणि आपुलकीची ढब ,त्यामुळे ते आम्हाला नेहमी "आपल्यातलेच" वाटायचे. शहरी भाषा किंवा पुस्तकातले अवघड शब्द न वापरता ते गणित अशा पद्धतीने समजावायचे की अगदी अवघड वाटणारं गणितदेखील आम्हाला समजायचं.ते केवळ शिक्षक नव्हते तर ते एक प्रेमळ मोठा माणूस ज्यांनी गणितासोबत माणूसपण शिकवलं.

       असे हे आम्हाला घडवणारे, आमच्या आयुष्याचे शिल्पकार होते...ज्यांनी पुस्तकाबाहेरचं शिकवलं, माणूसपण शिकवलं, शिस्त आणि सर्जनशीलतेचा समतोल साधायला शिकवलं.आज आम्ही जे काही आहोत, त्यामागे याच शिक्षकांची शिकवण आहे प्रेमळ पण कठोर, साधी पण प्रभावी आणि म्हणूनच, त्यांच्या आठवणी कायम आमच्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत.

                या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भरभरून देणग्या दिल्या, अनेक भेटवस्तू दिल्या… पण खरी भेट होती ती आमच्या डोळ्यांतली ओल. बॅकग्राउंडला वाजणारी धर्मवीर चित्रपटातली "गुरुपौर्णिमा" ही भावस्पर्शी धून संपूर्ण वातावरण अधिकच भारून टाकत होती. क्षणभर असं वाटलं वेळ थांबली आहे.२०१२ मध्ये थांबलेला काळ पुन्हा २०२५ मध्ये जागा झाला होता.तेच शाळेचं अंगण, तीच घंटा… आणि चेहऱ्यांवर तीच निरागसता पण या वेळी डोळ्यांत कृतज्ञतेचा ओलसर प्रकाश होता..शाळेने आम्हाला शिकवलं, घडवलं, उभं केलं आणि जेव्हा आम्ही मोठे झालो, तेव्हा पुन्हा एकदा तिच्याच कुशीत परत आलो… एक "मुलं" म्हणून, ज्यांची मनं अजूनही तशीच आहेत.शाळा संपते, वर्ग सुटतो…पण शाळेची ही प्रेमळ साखळी ती मात्र आयुष्यभर आपल्याला मनाच्या खोल घट्ट गाठीने बांधून ठेवते.

                   कार्यक्रम संपल्यानंतर शाळेकडून सर्वांसाठी प्रेमाने जेवणाची व्यवस्था केली होती. पंगतीमध्ये बसताना, एकमेकांना वाढताना, हसताना , प्रत्येक क्षणात आपुलकी जाणवत होती.जेवण आटोपल्यानंतर आम्ही एकत्रितपणे आमच्या त्या वेळच्या १०वीच्या वर्गात गेलो… आणि जाऊन त्या जुन्याच बेंचांवर बसलो.त्याच बेंचांवर, जिथं कधीकाळी आम्ही स्वप्नं रंगवली होती, अभ्यासाच्या नावाखाली मस्ती केली होती, शिक्षेची भीती आणि परीक्षेचं दडपण वाटलं होतं.त्या क्षणी खरंच वाटलं आपण परत विद्यार्थी झालोय. वर्गात पुन्हा शिक्षक येऊन शिकवणी सुरू करतील, आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा तिथून चालू होईल.सगळं तसंच होतं… फक्त आपण बदललो होतो. पण त्या क्षणी, त्या जागेवर बसताना, पुन्हा आमचं विद्यार्थ्यांपण जागं झालं होतं.आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी खूप चांगल्या गप्पा मारत होतो. इतक्या वर्षांनी भेटलेली मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र, पुन्हा त्या वर्गात. बोलायला एवढं होतं, की कुणाचंच बोलणं थांबत नव्हतं. जुन्या आठवणी, किस्से, शिक्षकांच्या गोष्टी, शाळेच्या खोड्या एकेक करून सगळं उलगडत होतं.काळजाच्या तळातून येणाऱ्या आठवणी होत्या त्या.आणि प्रत्येकाच्या नजरेत एकच भावना होती हे क्षण पुन्हा मिळणार नाहीत..मोबाईल कॅमेऱ्यात एक एक क्षण जपत होतो आम्ही पण खरंतर ते आधीच मनात खोल कुठेतरी कायमचे साठवले गेले होते.

              कितीही वर्षं लोटली, जग बदललं, आपण बदललो... पण शाळा नाही बदलली. ती अजूनही आपल्याला आपलीशी वाटते. दरवर्षी नव्या मुलांचं स्वागत करत करत असतानाही ती आपल्यासाठी जागा ठेवून बसलेली आहे.जणू म्हणतेय, "तुम्ही जिथून गेलात, ती जागा अजूनही तशीच आहे. आपणही कितीदा तरी म्हणतो शाळा संपली...पण खरंतर, शाळा कधीच संपत नाही. ती आपल्यात कुठंतरी खोलवर घर करून बसलेली असते ,आठवणींच्या गाभाऱ्यात."

© 2025 अक्षय पांडुरंग पाटील, सोनवडे